संगमनेरच्या अमरधाम प्रकरणी नगर अभियंत्यासह दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

<p>संगमनेर : संगमनेर येथील हिंदू अमरधामचे सुशोभीकरणाचे  काम झालेले असतानाही त्याच कामासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात पुन्हा निविदा काढण्यात आल्या. वास्तविक संगमनेर नगर परिषदेच्या नगर अभियंत्यांनी सदर निविदा प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रत्यक्ष स्थळ पाहणीचा अहवाल सादर करणे अपेक्षित असताना त्यांनी तसे न करता निविदा काढून पालिकेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संगमनेर नगर परिषदेच्या नगर अभियंता सह कनिष्ठ श्रेणीतील अभियंत्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

         <p>याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार १६ नोव्हेंबर २०२१ ते ७ मार्च २०२२ या काळात संगमनेर नगर परिषदेचे नगर अभियंता राजेंद्र सुतावणे आणि कनिष्ठ अभियंता सूर्यकांत गवळी यांनी संगनमत करून शहरातील हिंदू स्मशानभूमीचे सुशोभीकरण व नूतनीकरणाचे २०१९ मध्ये काम झालेले असतानाही त्याच कामासाठी टप्पा दोन व तीन साठी सुमारे ३३ लाख रुपयांच्या दोन स्वतंत्र निविदा पुन्हा प्रसिद्ध केल्या. त्यांच्या या कृतीतून त्यांनी पालिकेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक पुढार्‍यांनी त्या विरोधात मोठे रान उठवले होते. त्यामुळे याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी नि:पक्ष चौकशी व्हावी यासाठी श्रीरामपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार शिंदे यांनी या प्रकरणाची चौकशी करून तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सोपविला होता. त्यातून नगर अभियंता राजेंद्र सुतावणे व कनिष्ठ अभियंता सूर्यकांत गवळी यांचा हेतू स्पष्टपणे समोर आल्याने गुरुवार (दि.१६)सप्टेंबरच्या मध्यरात्री श्रीरामपूर पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या दोघांच्या विरोधात फिर्याद दाखल केली असून वरील दोन अधिकाऱ्यांनी संगणमत करून पालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी भा.द.वि कलम ४२०, ५११, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. घडलेल्या या प्रकाराने संगमनेर शहर आणि जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here