सांगलीत आरटीओकडून पुणे-बेंगळुरु महामार्गावर प्रवासी वाहनांची झाडाझडती

0

सांगली : नाशिक येथे खासगी लक्झरी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभाग खडबडून जागा झाला.रविवारी रात्री उशिरापर्यंत बेंगलुरु-पुणे महामार्गावर वाहनांची तपासणी सुरु होती. यामुळे पेठ नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्याचे पहायला मिळाले.

पेठ नाक्यावर उपप्रादेशिक परिवहन आणि पोलीस कर्मचारी रात्री उशिरापर्यंत प्रवासी वाहने तपासणी करत होते. विशेषत: पुणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची झाडाझडती सुरु होती. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवणे, अधिकृत तिकीट नसणे, चालक गणवेषात नसणे, चालकाच्या केबिनमध्ये प्रवासी भरणे आदींची नोंद घेण्यात आली. पेठ नाक्यावर खासगी वाहनातूनही मोठ्या प्रमाणात प्रवासी भरुन मुंबई, पुण्याकडे नेले जातात. यामध्ये मालवाहू ट्रक, दुधाचे टॅंकर्स आदींचा समावेश असतो. त्यांचीही झाडाझडती घेण्यात आली. एसटी महामंडळाच्या शिवशाही व एसटींकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले.

रविवार असल्याने प्रवासी गाड्या खचाखच भरुन धावत होत्या. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सनी अवाजवी प्रवासभाडे घेऊन प्रवाशांची लूट केली. बसेस भरुन धावत असल्याने पेठनाक्यावरील प्रवाशांनी मालवाहू गाड्यांचा आधार घेण्याचा प्रयत्न केला, पण तपासणी सुरु असल्याने ती थांबली नाहीत. त्यामुळे प्रवाशांचे हालही झाले.

आरटीओचे याकडे दुर्लक्ष का?

- सर्रास खासगी ट्रॅव्हल्स टप्पा वाहतूक करतात
- सणासुदीच्या व गर्दीच्या दिवशी प्रवासभाडे वाढवून लूट करतात
- क्षमतेपेक्षा आणि परवान्यापेक्षा जास्त प्रवासी भरतात
- चालकाच्या केबीनमध्येही अनधिकृतरित्या प्रवासी बसवतात
- सांगली, मिरजेत भररस्त्यात पार्कींग करुन वाहतूक कोंडी करतात
- वातानुकुलन, आरामदायी आसनव्यवस्था याची फक्त जाहिरात, प्रत्यक्षात अनेक गाड्यांची दुरवस्था 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here