सांगली : उसावर करप्याचा वाढता फैलाव

0

कडेगाव; संदीप गायकवाड : कडेगाव तालुक्यात बहुतांश गावात काही दिवसांपासून उसावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे तालुक्यातील शेकडो एकर ऊस वाळून त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.
करप्याचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी विविध कीटकनाशकांचा वापर करत आहेत. मात्र त्याचा फायदा होत नसल्याचे चित्र आहे.

कडेगाव तालुक्यात ताकारी, टेंभू योजनेचे पाणी आल्यापासून तालुक्यात ऊसक्षेत्रात प्रचंड वाढ झाली आहे. याचा परिसरातील साखर कारखानदारांना याचा मोठा फायदा होत आहे. आता तर शेतकर्‍यांत विक्रमी ऊसउत्पादन घेण्याकडे कल आहे. ऊस हे पीक शेतकर्‍यांना जास्तीत – जास्त उत्पादन आणि उत्पन्न देखील मिळवून देणारे आहे. यामुळे शेतकर्‍यांचा ऊस लागवडीकडे मोठा कल आहे. मात्र उसावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. कमी उत्पादनाच्या रुपाने त्याचा कारखानदार व शेतकर्‍यांना मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

आधीच तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील ऊस हुमणी किडीने बाधित झाल्याने शैतकरी वैतागला आहे. त्यातच करप्या रोगामुळे शेतकरी मेटाकुटीला आहे. आता तर शेतकरी करप्या रोखण्यासाठी विविध औषधांचा वापर करत आहे. मात्र ही कीड आटोक्यात येत नसल्याने शेतकरी धास्तावला आहे. हातातोंडाला आलेले पीक डोळ्यासमोर वाळत आहे. यामुळे शेतकर्‍यांवर बिकट संकट कोसळले आहे.
प्रामुख्याने तालुक्यातील शिवणी, अमरापूर, चिखली, कडेपूर, हणमंतवडिये, वडियेरायबाग, कोतीज, खेराडे, तोंडोली यांसह अन्य गावातील उसाचे क्षेत्र करप्याने बाधित झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला आहे. बँकेची कर्ज कशी फेडायची या चिंतेत सध्या शेतकरी आहेत. करप्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साखर कारखानदार व कृषी विभागाने लक्ष देण्याची मागणी शेतकरी वर्गांतून जोर धरत आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here