सातारा जिल्ह्यातील कारखानदारांकडून एफआरपी देण्यास टाळाटाळ

0

सातारा : कोल्हापूर व सांगलीचा तिढा सुटला असताना सातार्‍यात मात्र ऊस दराचे घोंगडे भिजतच राहिले आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीतील कारखानदारांना जमते, मग सातार्‍यात का होत नाही?
असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. दर जाहीर न केल्याने कारखानदारांविषयी शंका निर्माण होऊ लागली आहे. यामुळे शेतकरी संघटनांही आक्रमक पवित्र्यात असून, कोल्हापूरप्रमाणे महामार्ग रोखण्यासारखे तीव्र आंदोलन करण्याची तयारी सुरू आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि शेतकर्‍यांनाही न्याय मिळावा, यासाठी प्रशासनाने यात हस्तक्षेप करण्याची मागणी होऊ लागली आहे.

स्वाभिमानीच्या मागणीला सन्मान देत उसाला प्रतिटन 3 हजारांपेक्षा जास्त दर देणार्‍या कारखानदारांनी 50, तर 3 हजारांपेक्षा कमी दर देणार्‍या कारखानदारांनी गत हंगामातील 100 रुपये आणि यंदाच्या उसाला एफआरपी अधिक 100 रुपये देण्यास मान्यता दिली आहे. सांगलीत एफआरपी अधिक 100 रूपये देण्यास मान्य केले आहे. सातारा जिल्ह्यात मात्र सर्व साखर कारखानदार एकमेकांचा अंदाज घेत बसले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी चर्चा करून खटाव-माण अ‍ॅग्रो प्रोसेसिंग कारखान्याने 3 हजार 50 तर ग्रीन पॉवर गोपूजने 3 हजार 6 रूपये तर फलटण येथील श्रीराम कारखान्याने 3051 रुपये दर जाहीर केला. मात्र, या व्यतिरिक्त इतर कारखान्यांनी काय दर देणार? हे सांगितलेलेच नाही. स्वाभिमानीने आंदोलन थांबवले असले तरी अंतर्गत धुसफूस आता सुरू झाली आहे. त्यामुळे कारखानदारांची भूमिका महत्वाची बनली आहे. कोल्हापुरात जसा महामार्ग रोखला त्याप्रमाणे तीव्र आंदोलनाचे हत्यार सातारा जिल्ह्यात केलेे जाण्याची शक्यता वाढू लागली आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कारखानदार याला जबाबदार राहणार आहेत.

जर कोल्हापूर व सांगलीतील कारखानदारांना सुमारे 3200 रूपयांचा दर देणे शक्य आहे तर सातार्‍यातील कारखानदारांना हे का शक्य नाही? असा असा सवाल केला जात आहे. कोल्हापुरात आंदोलन सुरू झाल्यानंतर सातार्‍यातही स्वाभिमानीने सातारा, फलटण, खटाव, कोरेगाव येथे चक्काजाम आंदोलन केले. ऊस वाहतूक रोखून ऊस दर जाहीर करण्याची मागणी केली. मात्र, सातार्‍यातील कारखानदारांनी या आंदोलनाला फाट्यावर मारत गप्प बसण्यातच धन्यता मानली. त्यामुळेच आता धुसफूस वाढून शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करण्याच्या भूमिकेत आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला तेजी

आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेले साखरेचे दर आणि केंद्र सरकारनेही इथेनॉलच्या दरात केलेली वाढ याचा सकारात्मक परिणाम देशातील साखर उद्योगावर होणार आहेत. परंतु, यंदा पावसाअभावी साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. उत्पादनात घट झाल्यानंतर देशांतर्गत बाजारपेठेत साखरेला बर्‍यापैकी दर मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर इतर उपपदार्थांमधून साखर कारखान्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.कोल्हापुरातील कारखाने मागील पैसे व यंदाची एफआरपी अधिक 100 रुपये देऊ शकतात. तर सातार्‍यातील कारखानदारांनाही हे शक्य आहे. शेतकर्‍यांमध्ये संताप असून, लवकरच मोठे आंदोलन करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये प्रशासनानेही हस्तक्षेप करून या विषयावर तोडगा काढावा.
– राजू शेळके स्वाभिमानी, जिल्हाध्यक्ष 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here