पॉप्युलर ऑफसेटच्या कार्यालयात झाला कार्यक्रम
उरण दि 23(विठ्ठल ममताबादे ) : उरण येथून नियमित प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक झुंजार मतच्या 26 व्या वर्षीच्या दिवाळी अंकाचे शानदार प्रकाशन पॉप्युलर ऑफसेट प्रिंटिगच्या कार्यालयात संपन्न झाले. पॉप्युलर ऑफसेट चे मालक अंकुश उर्फ (दादा ) उकार्डे , विवेकशेठ उकार्डे संपादक अजितदादा पाटील आणि परागशेठ उकार्डे यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा साजरा झाला. यावेळी पॉप्युलर ऑफसेट मधील कर्मचारी वृंद , साप्ताहिक झुंजार मतचे संपादकीय मंडळातील सर्व सहकारी उपस्थित होते . 26 वर्षे नियमित वृत्तपत्र चालविणे हे काही खाऊ नसून संपादक अजित पाटील यांनी हे शिवधनुष्य अतिशय उत्तम रित्या उचलून ते चांगले जोपासले असल्याचे गौरोद्गार यावेळी अंकुश उकार्डे यांनी काढले . वृत्तपत्र चालविणे त्याच्यासाठी जाहिराती मिळविणे आणि मिळविलेल्या जाहिरातींची बिले वेळेवर मिळविणे ही अक्षरश: तारेवरची कसरत आहे मात्र अजित पाटील यांची धडपड आम्ही गेली 25 वर्षे बघत आहोत त्यांनी अगदी पोटच्या मुलासारखे आपल्या वृत्तपत्राला जपले आहे त्यामुळेच ते तग धरून आहेत आणि आज हा 26 वा दिवाळी अंक ते प्रकाशित करीत आहेत. आज प्रकाशित हा दिवाळी अंक अतिशय वाचनिय आणि संग्रही ठेवावा असा झाला आहे . त्यामध्ये अनेक नावाजलेल्या आणि नवोदित लेखकांच्या लेखांचा समावेश आहे. त्याचबरोबर दिवाळी अंकाची मांडणी देखील उत्तम झाली असून झुंजार मतचा हा दिवाळी अंक वाचकांना नक्कीच पसंत पडेल असेही त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी सर्वांनी संपादक अजित पाटील यांना भरभरून शुभेच्छा दिल्या . आणि सर्व टीमचे अभिनंदन केले . सहसंपादिका मिनाक्षी अजित पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.