वेळीच उपाय योजना न केल्यास समृद्धीचे काम बंद पाडण्याचा शेतकऱ्यांचा इशारा !

कोपरगाव : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या चुकीच्या बांधकामांमुळे स्थानिक रस्त्यांवर बांधण्यात आलेल्या डक ( भुयारी रस्ता) मध्ये पावसाचे पाणी साचल्याने स्थानिक शेतकऱ्यांचे दळण-वळणच बंद झाल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी लवकरच कायमस्वरूपी उपाय योजना न केल्यास समृद्धी महामार्गाचे काम बंद पडण्याचा इशारा स्थानिक शेतकऱ्यांनी दिला आहे. राज्याच्या समृद्धीत भर घालणारा हा महामार्ग मात्र कोकमठाण शिवारातील शेतकऱ्यांच्या जीवावर उठला असल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

यावेळी शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की समृद्धी महामार्ग तयार होताना कोकमठाण शिवारामधील अनेक रस्त्यांना छेदून गेला आहे अशा प्रत्येक ठिकाणी भुयारी मार्ग (डक ) तयार करण्यात आले आहेत. मात्र हे डक तयार करताना जमिनीच्या नैसर्गिक उताराचा अजिबात विचार केला गेला नाही ,त्यामुळे दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामध्ये या डक मध्ये अक्षरशः ५ ते ६ फूट पाणी साचले आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाणारे आणि दुसऱ्या गावांकडे जाणारे रस्ते बंद झाले आहे. त्याच प्रमाणे कोपरगाव पुणतांबा श्रीरामपूर या प्रमुख जिल्हा मार्गावरील डक मधेही पाणी साचल्याने दोन दिवस वाहतूक बंद होती. बंद रस्त्यांमुळे दूध उत्पादकांना दूध पोहच करता न आल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. तर शेतातून चारा आणता न आल्याने जनावरांनाही उपासमार झाली आहे. लवकरच साखर कारखाने सुरु होणार आहे. हे डक आणि रस्ते त्वरित दुरुस्त न झाल्यास ऊस वाहतुकीलाही अडचण निर्मण होणार आहे. समृद्धी आणि स्थानिक रस्त्यांच्या काही ठिकाणी असलेल्या शेतामध्ये पाण्याचा निचरा होत नसल्याने शेतामध्ये पाणी साचून राहत आहे. त्यामुळे शेतातील उभी पिके सडून चालली आहेत. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या या नुकसानीस कोण जबाबदार आसा सवाल शेतकरी करीत आहेत. यावेळी संभाजी रक्ताटे, शरद थोरात ,सुधाकर रोहम,नंदकिशोर पवार,दशरथ गायकवाड, वसंतराव लोंढे ,सुखदेव वाघ आदी शेतकरी उपस्थित होते.