नवी दिल्ली : आधीच अपुरा कर्मचारी वर्ग, कामाचा वाढता बोजा यामुळे कर्मचारी वर्ग तणावाखाली काम करत आहेत. त्यातच व्यवस्थापनांच्या या मनमानी धोरणांमुळे कर्मचारी उद्विग्न झाले आहेत. त्यांच्यात वैफल्यतेची भावना निर्माण झाली आहे. बॅंकनिहाय संघटनांनी हे प्रश्न आपापल्या व्यवस्थापनाकडे उपस्थित करून वाटाघाटीद्वारे सोडवण्याचे प्रयत्न केले. पण ते अयशस्वी ठरले. त्यामुळे नाईलाजाने शेवटी संघटनेला उद्योग पातळीवर संपाची हाक द्यावी लागत असल्याचे कर्मचाऱ्यांचे नेते नंदकुमार चव्हाण यांनी सांगितले. बॅंक ऑफ बडोदा, बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, फेडरल बँक, सेंट्रल बँक, कॅथॉलीक सीरीयन बॅंक आदी बॅंकामधील औद्योगिक संबंध सध्या अनेक बॅंकनिहाय प्रश्नांवरून तणावपूर्ण झाले आहेत हे लक्षात घेता एआयबीईएने या संपाची हाक दिली आहे. आतातपर्यंत बँक व्यवस्थापनाकडून कर्मचारी संघटनांसोबत द्विपक्षीय चर्चा करून निर्णय घेतले जात होते. मात्र, चर्चेच्या या पद्धतीला छेद देत व्यवस्थापनाकडून एकतर्फी निर्णय घेतले जात असल्याचे कर्मचारी संघटनांनी म्हटले आहे. द्विपक्ष करारातील तरतूदीना धाब्यावर बसवून मनमानीपणे बँक व्यवस्थापन निर्णय घेत आहेत. त्या व्यवस्थापनाच्या धोरणांच्या विरोधात संप पुकारण्यात आला असल्याची माहिती बँक कर्मचाऱ्यांचे नेते देविदास तुळजापूरकर यांनी दिली.