गोंदवले,विजय ढालपे : खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे विरोधकांना थेट आव्हान दिलं आहे. जोपर्यंत जिहे-कठापूरचे पाणी हिंगणीत सुटत नाही, टेंभूच्या योजनेचे भूमिपूजन करत नाही तोपर्यंत आपण निवडणूक लढणार नाही, असा शब्द जयकुमार गोरे यांनी जाहीर कार्यक्रमात दिला आहे.बिजवडी येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, माण-खटावमधील ४४ गावांसाठी टेंभू प्रकल्पांतर्गत अडीच टीएमसी, तर माणच्या उत्तरेकडील २१ गावांसाठी जिहे-कठापूरचे दीड टीएमसी पाणी फेरवाटपामुळे आरक्षित झाले. त्यासाठी निधीही मंजूर झाला.
जिहे- कठापूर योजनेचे भूमिपूजन करून पाइपलाइनचे काम सुरू आहे, तर नुकतेच ४४ गावांच्या सिंचनासाठी ६८४ कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे. एका महिन्यात टेंडर निघून या योजनेचे लवकरच भूमिपूजन होईल.
जोपर्यंत जिहे- कठापूरचे पाणी हिंगणीत सुटत नाही, टेंभूच्या योजनेचे भूमिपूजन करत नाही, तोपर्यंत आपण निवडणूक लढणार नाही हा माझा शब्द आहे, असं आमदार जयकुमार गोरे यांनी जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवलं.
टेंभू योजनेच्या अंतर्गत दुष्काळग्रस्त भागाला भरघोस निधी आमदार जयकुमार गोरे यांच्या पाठपराव्यामुळे मिळाला आहे. आता या भागात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू होत आहेत. त्यासाठी आमदार जयकुमार गोरे यांचा सत्कार ठेवण्यात आला होता. यावेळी एका गावांतील कार्यक्रमात गोरे यांनी हे विधान केलं आहे.