वडगाव निंबाळकर कोऱ्हाळे खुर्द रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, पुल नव्याने बांधून मिळावा ग्रामस्थांची मागणी

0

बारामती : वडगाव निंबाळकर कोऱ्हाळे खुर्द रस्त्यावर खोमणे वस्ती येथे चारी वरील पुलाचे काम नुकतेच पुर्ण झाले आहे. सदर काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. मुळ रस्त्यापासून सुमारे तीन फूट खोल खड्ड्यात पुल झाला आहे. यामुळे चारीतील प्रवाही पाण्याच्या मार्गाला अडथळा होणार आहे. परिणामी परिसरातील चारीच्या कडेला राहणाऱ्या रहिवाशांच्या घरात पुलाच्या अडथळ्यामुळे पाणी शिरू शकते. काम सुरू होताना स्थानिक रहिवाशी आणि ग्रामपंचायत प्रशासनाला विचारात घेतले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांनी सोयीस्कर रित्या काम केले यामुळे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. सर्विस रोड काढला गेला नाही. यामुळे महिनाभर नागरिकांची गैरसोय झाली. पुलाचा स्लॅब सुरू असताना त्यामध्ये दगडी भरली गेली. स्लॅप टाकल्यानंतर बाहेरून दगडी दिसत होती. याचे फोटो उपलब्ध आहेत. सदर कामाचा दर्जाबाबत ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच सुनील ढोले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता उदय नांदखिले यांच्याकडे चौकशी केली असता सदर काम सगुणा कंट्रक्शन करत असल्याचे सांगण्यात आले. पुलाच्या कामासाठी नाबार्ड मधून ४६ लाख ५३ हजार रुपये निधी मिळाला आहे. निकृष्ट कामाबाबत कंत्राटदाराला विचारले असता अरेरावीची भाषा वापरली. शाखा अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता उलट सुलट उत्तरे देऊन दिशाभूल केली. अधिकारी आणि कंत्राटदार संगनमताने शासनाच्या निधीचा अपहार करीत आहेत.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून गावच्या विकास कामासाठी वेळोवेळी मोठ्या प्रमाणात निधी येत असतो, परंतु अधिकारी आणि ठेकेदार संगनमताने निधीचा गैरवापर करत असल्याचा गावातील हा तिसरा प्रकार आहे, नीरा डावा कालव्यावरील पुलाचेही काम योग्य रीतीने झाले नाही. एकूणच सर्वच पुलांच्या कामाची चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.
संबंधित कामाची पहाणी व चौकशी व्हावी व कामाचे बिल ठेकेदाराला अदा करण्यात येऊ नये. पुलाचे काम पुन्हा उंची वाढवून करण्यात यावे. अधिकारी ठेकेदार यांची अँटी करप्शन चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे, मागणीचा विचार न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
गावाच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींना पाठपुरावा करून गावांमध्ये निधी मिळवला जातो तो निधी मिळाल्यानंतर त्या निधीचे वरिष्ठ कार्यालयामध्ये टेंडर केले जाते व टेंडर ज्याला मिळाले त्याने ते काम उत्कृष्ट दर्जाचे करावे अशी ग्रामपंचायत व ग्रामस्थांची इच्छा असते परंतु स्थानिक प्रशासन व स्वराज्य संस्था तसेच ग्रामस्थ यांना विचारात न घेता ते काम संबंधित खात्याचा अभियंता यांच्या संगनमताने कामे केली जातात व त्यात स्थानिक प्रशासनाला व ग्रामस्थांना विचारात न घेता काम पूर्ण केले जाते,

प्रशासनावर पकड असणारे व तालुक्यातील शासनाच्या निधितून मिळालेल्या जवळजवळ सर्वच बांधकामावर जातीने लक्ष घालणारे कर्तव्य तत्पर विद्यमान उपमुख्यमंत्री या कामात लक्ष घालणार का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here