मोदींना देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार नाही . 

0

पाटण दि . २७ ( प्रतिनिधी ) देशात आज मोठ्या प्रमाणावर राजकीय अराजकता माजली असून मोदी कालखंड हा देश हिताचा ठरला नसल्याने देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही . सातारा जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्राला स्व . यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची परंपरा असून आता निवडणूक काळात काहींना यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची आठवण होतेय ही आनंदाची बाब आहे . स्व . यशवंतरावांचे विचार व परंपरा जोपासायची असेल तर या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनाच संसदेत पाठवा असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख खासदार व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केले .
    पाटण येथे महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते .
   यावेळी माजी मुख्यमंत्री आ . पृथ्वीराज चव्हाण , माजी पालकमंत्री आ . बाळासाहेब पाटील , खासदार श्रीनिवास पाटील , माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर  , महाविकास आघाडीचे उमेदवार आ . शशिकांत शिंदे , आ .अरुण लाड , राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर , माहिती व तंत्रज्ञान विभागाचे राज्याचे प्रमुख सारंग पाटील , शिवसेना उ .बा . ठा . पक्षाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम , श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ . भारत पाटणकर , राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव , प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील , दिपक पवार , राजेंद्र पवार आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती .
   यावेळी बोलताना खा . शरद पवार पुढे म्हणाले यशवंतरावांचे विचार जोपासणे हे निश्चितच आव्हानात्मक आहे आणि ते आव्हान एक सर्वसामान्य म्हणून आम्ही आतापर्यंत जोपासत आलो आहोत . सध्या राज्यातील असो अथवा केंद्रातील सरकार हे मतलबी व आराजकता माजवणारे आहे . ही निवडणूक प्रामुख्याने प्रचंड महागाई , बेरोजगारी , जातीयवाद या प्रमुख मुद्द्यांवर होत असल्याने याचा सर्वसामान्य मतदारांनी अतिशय गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे . आजचे पंतप्रधान राहुल गांधी , गांधी घराणं व नेहरूंच्यावर टीका टिप्पणी करण्यात मशगुल आहे . ज्या माणसांनी व कुटुंबाने आपल्या स्वातंत्र्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली दुर्दैवानं त्यांच्यावरच टीका , टिंगल टवाळी करणे हे या देशातल्या जनतेला कधीही मान्य होणार नाही . आजच्या या महागाईत महिला घर तर सर्वसामान्य जनता वाहनं चालवू शकत नाहीत . सन २०१४ च्या तुलनेत आज प्रचंड महागाई वाढली आहे देशातील ८७ टक्के तरुण बेरोजगार आहेत . जातीयवाद , धार्मिकता यावरच आज हा देश चालवला जात आहे . ज्या गांधी , नेहरू घराण्यांनी आपल्या त्यागाची स्वातंत्र्यात मोलाची भूमिका बजावली दुर्दैवाने त्यांचीच टिंगल टवाळी टीका करण्यात आजच्या राज्यकर्त्यांना धन्यता वाटते हे दुर्दैव आहे . विद्यमान पंतप्रधान त्या पदाची गलिमा राखू शकले नाहीत , त्यामुळे यापुढे देश नक्की कोणाच्या हातात द्यायचा हे ठरवणारी येणारी लोकसभेची निवडणूक असल्याने निश्चितच सातारा जिल्हाच नव्हे तर राज्य व देशातही परिवर्तन अपेक्षित आहे . या अपेक्षित परिवर्तनामध्ये शशिकांत शिंदे सारख्या एका अभ्यासू , परखड व्यक्तिमत्वाला आपण संसदेत बहुमताने पाठवा असे आवाहनही शेवटी शरद पवार यांनी केले . यावेळी बोलताना आ . पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की सध्या राज्यात फक्त पक्ष फोडणे ,  खोकी , ई . डी . , सि . बी . आय . सारख्या संस्थांच्या दबाव व आमिष दाखवण्यापलीकडे काहीच घडत नाही . सत्ताधाऱ्यांनी भलेही आमदार , नेते फोडले असले तरी सर्वसामान्य मतदार मात्र या सर्वांची चीड बाळगून आहेत . आता राज्यघटना बदलण्याची हिंमत करणाऱ्या व लोकशाहीसाठी घातक असलेल्या विघातक वृत्तींविरुद्ध ही निवडणूक होत असल्यामुळे तुम्ही आम्ही बेसावध न राहता अत्यंत जबाबदारीने चांगल्या खासदारांना विजय करण्यासाठी सर्वस्व समर्पित करणे गरजेचे आहे . सध्याचे पालकमंत्री आपल्या पदाचा वापर , गैरवापर करत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अजित पवार या अनैतिक सरकार विरोधात आपल्याला लढायचं असेल तर पाटण मतदारसंघातून प्रचंड अपेक्षा आहेत . महागाई , बेरोजगारी , शेतकरी आत्महत्या , भ्रष्टाचार , अनैतिकता , आर्थिक बट्ट्याबोळ असे महाराष्ट्रातील जे नाट्यमय राजकारण सुरू आहे ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी , अमित शहा यांच्याच आशीर्वादाने होत असल्याने आता या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी शशिकांत शिंदे सारख्या प्रामाणिक माणसाला आपण निवडून देणे सार्वत्रिक हिताचे ठरणार आहे . या निवडणुकीच्या निकालात गद्दारांना त्यांची जागा दाखवण्याची खरी जबाबदारी आपल्या या मतदारसंघातील सर्वसामान्य मतदाराच्या हातात आहे , त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष , राष्ट्रीय काँग्रेस , शिवसेना उ . बा . ठा . पक्ष आदी सर्वच मित्र पक्षांचे नेते , पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे बूथ कमिट्या करून , सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचून ही निवडणूक महाविकास आघाडीच्या विजयाची करावी असे आवाहन त्यांनी केले .
   आ . शशिकांत शिंदे म्हणाले पवार साहेबांशी निष्ठावंत कसा असावा हे आजवर विक्रमसिंह पाटणकरांनी तर शेलार मामा कसा असावा हे श्रीनिवास पाटील यांनी दाखवून दिले आहे . त्यांच्या याच तालुक्यात सत्ताधारी राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड जनतेचा रोष आहे . तो रोष घालवत नव्याने क्रांती करायची असेल तर माझ्यासारख्या सामान्य माथाडी व कायमचं पवारांशी एकनिष्ठ असलेल्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी आपण सर्वजण प्रामाणिकपणे प्रयत्न कराल . माझ्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून जाणीवपूर्वक कारवाया केल्या जात आहेत मात्र माझा जीव गेला तरी चालेल पण मी पवार साहेबांची साथ कधीही सोडणार नाही . आपल्या सत्तेचा गैरवापर करत माझ्यावर कितीही केसेस टाकल्या तरीही मी मरेपर्यंत पवार साहेबांचा कट्टर व निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून राहील . ही निवडणूक शरद पवार , राहुल गांधी , उद्धव ठाकरे तसेच आपल्या लोकसभेसाठी माझ्यासाठी तितकीच महत्त्वाची असून पाटणची जनता या निवडणुकीत क्रांती करेल . कराड आणि पाटणचे मताधिक्य ही माझ्या विजयाची खरी नांदी असेल आणि माझी लढाई तत्त्वाची , शरद पवार नेत्याची आणि साताऱ्याच्या स्वाभिमानाची असल्याने आपण सर्वजण माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहाल याची मला खात्री आहे .
    सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले आपल्या सर्वांचेच भवितव्य ठरवणारी निवडणूक ही असून चारशे पारचा नारा देणाऱ्यांना या निवडणुकीत आपण धडा शिकवू . सर्वसामान्य माणूस व लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची असून देशात , राज्यात व जिल्ह्यातही राजकीय मुजोरी वाढली आहे , गद्दारांची फौज , पक्ष फोडा व वाट्टेल ते थराला जाऊन काम करत असून या निवडणुकीत गद्दारांना थारा न देता सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजून घेणारे , आपल्या सुखदुःखात सहभागी होत आंदोलने , उपोषणात आपल्या पाठीशी ठाम उभे राहण्यासाठीच शशिकांत शिंदे यांना निवडून देत पाटण तालुका या निवडणुकीत मताधिक्याचा सिंहाचा वाटा उचलेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला .
   डॉ . भारत पाटणकर म्हणाले हुकूमशाहीचा पराभव करत लोकशाहीचा विजय करण्यासाठीची ही निवडणूक आहे . सध्या देशात मोदी शहांसह आदानी , अंबानीसारखी हाताच्या बोटावर मोजणारी माणसं आपला देश चालवतायेत , त्यामुळेच महागाई , बेरोजगारी , अत्याचार  ,जातीयवाद वाढला आहे . पाटण मतदारसंघात तर सर्वाधिक हुकूमशाही पहायला मिळत आहे . निवडणुका आल्यावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न देण्याची मागणी करतात मग त्यांच्या काळात त्यांचे हात अथवा तोंड कोणी बांधले होते हा विचार करणे गरजेचे आहे . येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय हा आपल्या सर्वांच्या सार्वत्रिक हिताचा ठरणार आहे .
      यावेळी माजी पालकमंत्री आ . बाळासाहेब पाटील , माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर , हर्षद कदम आदी मान्यवरांची भाषणे झाली . स्वागत सुभाषराव पवार यांनी तर आभार प्रदर्शन राजाभाऊ शेलार यांनी केले .
   या महामेळाव्यास राष्ट्रवादी पवार पक्ष , राष्ट्रीय काँग्रेस , शिवसेना उ . बा. ठा . पक्षाचे पदाधिकारी , राष्ट्रीय काँग्रेसचे नरेश देसाई , श्रीनिवास पाटील , सेनेचे सुरेश पाटील , बाळासाहेब राजे महाडिक अॅड . अविनाश जानुगडे , सौ . स्नेहल जाधव , दिनकरराव घाडगे , सुभाषराव पवार , टाटाचे कामगार नेते सुजित पाटील , माजी शिक्षण सभापती राजेश पवार  , नगराध्यक्षा सौ . मंगल कांबळे , उप नगराध्यक्ष सागर पोतदार 
तसेच महाविकास आघाडी मित्र पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने पाटण विधानसभा मतदारसंघातील लोक उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here