रमजान ईद बंधुभाव व प्रेमाचा संदेश देणारा सण – आ.बाळासाहेब थोरात
संगमनेर : भारतीय परंपरा ही विविधतेने नटलेली असून प्रत्येक सण हे एकात्मतेचा व आनंद देणारे असतात. सर्व धर्मियांनी सर्व सण एकत्र साजरे करणे ही भारताची समृद्ध परंपरा असून पवित्र रमजानच्या उपवसानंतर येणारा रमजान ईद हा सण हा एकात्मता, बंधुता व प्रेमाचा संदेश देणारा असल्याचे प्रतिपादन माजी महसूल आणि कृषिमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
ईदगाह मैदान येथे रमजान ईद निमित्त दूरध्वनीद्वारे मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देतांना ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, विश्वासराव मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, किशोर कालडा, किशोर टोकसे ,निखिल पापडेजा, गणेश मादास, अभय खोजे, जीवन पांचारीया, अजित काकडे , मुन्ना कडलग, शफी तांबोळी, शकील पेंटर ,लाला बेपारी, ऋतिक राऊत, अंबादास आडेप, कैलास अभंग, ॲड. सुहास आहेर, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे ,नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, पोलीस निरीक्षक भगवान माथुरे आदि उपस्थित होते.
यावेळी आ. बाळासाहेब थोरात म्हणाले कि, गेली अनेक वर्ष प्रत्येक रमजान ईदला मी संगमनेर मध्ये आपल्या सर्वांच्या मध्ये असतोच. आज रमजान ईद आणि अक्षय तृतीया हे दोन एकत्र सण असून सर्व हिंदू व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना ते पुढे म्हणाले की,राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सांगितले आहे की उपवास हा ईश्वराजवळ जाण्याचा मार्ग आहे. उपवास व प्रार्थना केल्याने मानवी जिवनात पवित्रता वाढते. रमजान महिना हा आनंददायी व प्रेरणा देणारा आहे. सर्व सण एकत्रित साजरे केल्याने सर्वांचा आनंद द्विगुणीत होतो. समता व बंधुभाव वाढवणारा असा हा रमजानचा पवित्र सण आहे. अनेक धर्म व पंथ असूनही एकात्मता ही आपली ताकद व सुसंस्कृती आहे. अशी ही भारतीय संस्कृती विविधतेने नटलेली आहे. संगमनेरात सर्वजण एकत्र येवून मोठया उत्साहात ईद हा सण साजरा करतात. सर्व समाज बांधव एकमेकांच्या सुःख,दुःखात सहभागी होतात. हे एकात्मतेचे,समतेचे व कौटुंबिक वातावरण ही संगमनेरकरांची वेगळी ओळख असल्याचेही त्यांनी म्हटले. यावेळी सर्व मुस्लिम बांधवांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
माजी आ.डॉ.सुधीर तांबे म्हणाले कि, शरीर, चित्त व मनाची शुध्दी करणारा उपवास असतो. एकमेकांवर प्रेम करा, बंधुभाव जपा ही मोठी शिकवण विविध धर्मांनी दिली आहे.रमजान ईद ही जगभर मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने साजरी करत असून पवित्र असा रमजान महिना हा जीवनात उत्साह व आनंद वाढविणारा आहे. हीच उर्जा घेवून आपण सर्वजण काम करत असतो. धर्म हा माणसे जोडण्यासाठी असतो. ईश्वर हा एकच असून आज रमजान ईद व अक्षय तृतीया हे दोन एकत्र सण आले हा योगायोग आहे. या निमित्ताने सर्व हिंदू व मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन हे साजरे केले आहेत हे आनंददायी असल्याचेही ते म्हणाले.यावेळी शहरातील व तालुक्यातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.