पंजाबमधील लुधियाना शहरातील गियासपुरा भागात गॅसगळती होऊन 11 जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी काहीजणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
लुधियाना पश्चिमच्या एसडीएम स्वाती तिवाना यांनी ही माहिती दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, “कोणत्या गॅसची गळती झाली हे शोधण्यासाठी एनडीआरएफची तुकडी घटनास्थळी रवाना झाली आहे. हा गॅसगळतीचा प्रकार आहे. आतापर्यंत या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 11 जण जखमी आहेत”.
स्वाती यांनी पुढे सांगितलं, “या भागातून लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढणं हे आमचं उद्दिष्ट आहे. आणखी लोकांना या गळतीचा त्रास होऊ नये हा आमचा प्रयत्न आहे. गॅसगळती नेमकी कुठून झाली आहे याचाही एनडीआरएफ शोध घेत आहे”.
घटनास्थळी उपस्थित लुधियानाचे अतिरिक्त उपायुक्त समीर वर्मा यांनी सांगितलं, “या परिसराला सील करण्यात आलं आहे. एनडीआरएफची तुकडी घटनास्थळी पोहोचत आहे”.
अग्निशमल दलाच्या गाड्याही घटनास्थळी आहेत. अन्य भागातल्या लोकांना या भागात येण्यापासून रोखण्यात आलं आहे.
ज्या ठिकाणी गॅसगळती झाली ते ठिकाण शहराच्या मध्यवर्ती भागात आहे.
घटनास्थळी पोहोचलेल्या तुकडीने सांगितलं की, “गॅसगळतीचा त्रास झालेल्या लोकांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू केले आहेत. किती लोक अडकलेत ते लवकरच कळेल”.
घटनास्थळी आमदार रजिंदर कौर छीना उपस्थित आहेत.
स्थानिकांचं काय म्हणणं?
एएनआयशी बोलताना एका महिलेने सांगितलं की, “माझ्या घरचे आतमध्ये अडकले आहेत. माझा मुलगा मृतदेह घेऊन जात आहे. त्यांना रुग्णवाहिकेत ठेवत आहे. मी काय बोलू”?
दुर्घटना घडली त्या भागात राहणारे डॉ. शंभू नारायण सिंह यांनी सांगितलं की त्यांच्या घरातले पाचजण बेशुद्ध झाले आहेत.
अंजन कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की त्यांच्या काकांचं संपूर्ण कुटुंब बेशुद्ध झालं आहे.
घरातल्या तिघांचं शरीर निळं पडलं आहे.