50 राज्यांत 1200 ठिकाणी आंदोलकांची गर्दी
अमेरिकेत ठिकठिकाणी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचा विरोध करण्यासाठी आंदोलक एकत्र जमल्याचं पाहायला मिळालं. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या विरोधात होणारं हे पहिलंच मोठं आंदोलन आहे.
‘हँड्स ऑफ’ नावाच्या या आंदोलनात अमेरिकेतील सर्व 50 राज्यांमध्ये जवळपास 1200 ठिकाणी ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शनांचं आयोजन करण्यात आलं. शनिवारी बॉस्टन, शिकागो, लॉस एंजल्स, न्यू यॉर्क आणि वॉशिंग्टन डीसीसह इतर शहरांमध्ये मोठ्या संख्येनं लोकांची गर्दी पाहायला मिळाली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांवरून आणि धोरणांवरून त्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. ट्रम्प यांनी जगातील बहुतांश देशांवर टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर लंडन, पॅरिस आणि बर्लिनसह अमेरिकेतही अशा प्रकारची निदर्शनं पाहायला मिळाली.
ट्रम्प यांच्या विरोधातील नाराजी
अमेरिकेत काही विद्यापीठात विद्यार्थ्यांवर इमिग्रेशनशी संबंधित छापे टाकले जात आहेत. त्यामुळं काही जणांना अटक आणि हद्दपारही करण्यात आलं आहे. त्यामुळं या आंदोलनात सहभागी झाल्याचं बॉस्टनमधील काही आंदोलक म्हणाले. लंडनमध्ये आंदोलक ‘WTAF अमेरिका?’, ‘लोकांना त्रास देणे थांबवा’ आणि ‘तो मूर्ख आहे’ असे फलक हाती घेत आंदोलनं केली.
ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणातील बदलांचा निषेध करत त्यांनी, हँड्स ऑफ कॅनडा, हँड्स ऑफ ग्रीनलँड, हँड्स ऑफ युक्रेन अशा घोषणा दिल्या. ट्रम्प यांनी कॅनडा आणि ग्रीनलँडला आपल्यात विलीन करण्यात वारंवार रस दाखवला आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी त्यांचा सार्वजनिक वादही झाला आणि युक्रेन आणि रशियामधील शांतता करारावर वाटाघाटी करण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला.
वॉशिंग्टन डीसीमध्ये हजारो आंदोलक डेमोक्रॅटिक खासदारांची भाषणं ऐकण्यासाठी जमले होते. त्यापैकी अनेकांनी ट्रम्प प्रशासनात महत्त्वाची भूमिका निभावणारे श्रीमंत देणगीदार आणि प्रामुख्यानं इलॉन मस्क यांच्यावर टीका केली.फ्लोरिडा काँग्रेसचे सदस्य मॅक्सवेल फ्रॉस्ट यांनी “आमचं सरकार अब्जाधीशांनी ताब्यात घेतलं आहे”, असं म्हणत टीका केली.