अभिनेता मनोज कुमार यांचं निधन!

0

मुंबई : हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन झालं आहे. ते 87 वर्षांचे होते. मुंबईत कोकिलाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मनोज कुमार यांनी ‘भारत कुमार’ या नावानंही ओळखलं जातं. रुपेरी पडद्यावर त्यांच्या खास अभिनय शैलीसाठी ते ओळखले जातात.

त्यांचे मूळ नाव हरिकृष्ण गोस्वामी होते. त्यांचा जन्म 1937 साली अबोटाबाद येथे झाला होता. आता हे स्थान पाकिस्तानात आहे. देशभक्तीवर मनोज कुमार यांनी अनेक सिनेमे केले, ते सर्व लोकप्रिय झाले त्यामुळे त्यांचे नाव भारत कुमार असेच झाले. एएनआय वृत्तसंस्थेने चित्रपट निर्माते अशोक पंडित यांचा एक व्हीडिओ शेअर केला. त्यात पंडित म्हणतात, “दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते आणि भारतीय सिनेसृष्टीतीले एक दिग्गज कलाकार मनोज कुमार आता आपल्यामध्ये राहिले नाहीत. सर्व सिनेसृष्टीसाठी हा मोठा धक्का आहे. सर्व चित्रपटउद्योग त्यांचे सतत स्मरण करत राहिल.”

मनोज नाव कसं मिळालं? या बाबत मनोज कुमार यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होत की बालपणी आमच्यासाठी चित्रपट हे जणू परीकथेसारखे असायचे. मला एकदा माझ्या मामानी एक चित्रपट दाखवला होता. त्या चित्रपटात दिलीप कुमार यांचा मृत्यू होतो. त्यानंतर अंदाजे 20-25 दिवसांनी आम्ही दुसरा चित्रपट पाहिला ‘शहीद’. त्यातही तसंच होतं. त्या चित्रपटातही त्यांचा मृत्यू दाखवला गेला. हे सगळं बघून मी गोंधळून गेलो. आईने मला काय झालं असं विचारलं, तर मी तिला म्हटलं, “आई, एक माणूस किती वेळा मरू शकतो?”

आईने उत्तर दिलं – “एकदाच.”

मग मी विचारलं – “जो दोन-तीन वेळा मरतो तो?”

आई म्हणाली – “तो फरिश्ता (देवदूत) असतो.”

तेव्हा “मलाही फरिश्ता व्हायचंय” असं माझ्या मनात आलं. मला चित्रपट पाहण्याची आवड निर्माण झाली होती. त्याच दरम्यान मी ‘शबनम’ नावाचा एक चित्रपट पाहिला. त्यातही दिलीप कुमार होते. त्या चित्रपटात त्यांचं नाव ‘मनोज’ होतं, आणि मला ते नाव खूप आवडलं. त्या काळात आम्ही एका रेफ्युजी कॅम्पमध्ये राहत होतो. तिथे वेगवेगळ्या भाषेच्या लोकांचा वावर होता. तिथे ‘मनोज’ नावाचं कोणीच नव्हतं. त्यामुळं मी तेव्हाच ठरवलं होतं की, अभिनेता बनल्यानंतर ‘मनोज’ हे नाव ठेवायचं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here