मुंबई : प्रसिद्ध हास्यकलाकार, लेखक व अभिनेता सागर कारंडे यांची सायबर गुन्हेगारांनी लाखो रुपयांची फसवणूक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
देशासह राज्यभरात सायबर फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वेगवेगळ्या युक्त्या वापरून सोशल प्लॅटफॉर्मवर सायबर ठग लहान मुलांपासून वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांचीच फसवणूक करत आहेत. मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींना सुद्धा याचा सामना करावा लागत आहे. सामान्य नागरिकांप्रमाणे अनेक कलाकार सुद्धा ऑनलाइन स्कॅमचे बळी पडले आहेत. मात्र, सागर कारंडे यांनी माध्यमांशी बोलताना ‘तो मी नव्हेच’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
मराठी हास्यकलाकार सागर कारंडे यांनी 31 मार्च 2025 रोजी दिलेल्या तक्रारीनुसार सायबर ठगांनी 61 लाख 83 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाची संपूर्ण माहिती ही पोलिसांनी दिलेली आहे. याप्रकरणी कांदिवली येथे सायबर पोलीस ठाण्यात (उत्तर विभाग) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 3 अज्ञात व्यक्तींविरोधात मुंबई सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी विविध पथकांमार्फत तपास करत आहेत.
‘तो मी नव्हेच’
गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण आता सर्वांसमोर आलेले आहे. या संदर्भात अभिनेते सागर कारंडे यांच्याशी बीबीसी मराठीच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता संवाद होऊ शकला नाही. मात्र, काही माध्यमांनी त्यांना या प्रकरणी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी उत्तर देणं टाळलं. ते म्हणाले की, “हे सगळं फेक आहे. सागर कारंडे नावाचा एकच माणूस नाहीये. खूप आहेत. सर्च केलं तर खूप दिसतील तुम्हाला. माध्यमांमध्ये जे येतंय, ते त्यांचं काम आहे, ते त्यांना करु देना. आपल्याला काय करायचं आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. त्यामुळे अनेक चर्चांना सध्या उधाण आले आहे