लोणंद : पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून दोन जणांनी संगनमताने एकाचा छातीत चाकू भोसकून, तसेच डोक्यात लाकडी फळकुटाने मारहाण करून खून केल्याची घटना येथे घडली. येथील इंदिरानगर परिसरातील बिरोबा मंदिरात शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, किरण किसन गोवेकर (वय ३२, रा. कोरेगाव, ता. फलटण) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी खून करून फरारी झालेल्या सतीश भाऊसाहेब काळे व रोहित शिवाजी डेंगरे (दोघेही रा. इंदिरानगर, लोणंद, ता. खंडाळा) या दोघा संशयितांना तासाभरात शिताफीने अटक केली आहे.
लोणंद पोलिसांच्या माहितीनुसार, आज दुपारी साडेबाराच्या सुमारास इंदिरानगरातील बिरोबा मंदिरात पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून सतीश काळे व रोहित डेंगरे यांनी संगनमताने किरण गोवेकर याच्या छातीत चाकू भोसकून, तसेच डोक्यात लाकडी फळकुटाने मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद प्रकाश किसन गोवेकर (वय ३५, रा. कोरेगाव) यांनी लोणंद पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार सतीश काळे व रोहित डेंगरे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे.
घटनेनंतर पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, वाईचे पोलिस उपअधीक्षक बी. वाय. भालचीम यांनी त्वरित संशयितांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या होत्या. लोणंदचे सहायक पोलिस निरीक्षक सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विशाल कदम, ज्योती चव्हाण, हवालदार चंद्रकांत काकडे, सचिन कोळेकर यांनी संशयितांची माहिती घेऊन त्यांना गुन्हा घडल्यापासून तासाच्या आत लोणंद येथे शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली.
या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक शिवाजी घुले, सहायक फौजदार देवेंद्र पाडवी, हवालदार चंद्रकांत काकडे, नितीन भोसले, सर्जेराव सूळ, विजय पिसाळ, धनाजी भिसे, संतोष नाळे, महेश टेकवडे, विठ्ठल काळे, सुनील नामदास, सचिन कोळेकर, सतीश दडस, केतन लाळगे, अभिजित घनवट, शेख शिंगाडे, राणी कुदळे, भारती मदने, स्नेहल कापसे, होमगार्ड सचिन निकम, अनिल पवार, सुहास काटकर, विकास कोकरे यांनी सहभाग घेतला.