बारकोडचा गैरवापर करून उत्पन्नाचा खोटा दाखला देणाऱ्या ऑपरेटरवर गुन्हा

0

शिर्डी, दि. १२ – तहसील कार्यालयाने आधीच इतर व्यक्तीसाठी दिलेल्या उत्पन्नाच्या दाखल्याचा बारकोड वापरून दुसऱ्या व्यक्तीसाठी खोटा दाखला तयार करत शासनाची फसवणूक केल्याच्या प्रकरणी पिंपळवाडी ग्रामपंचायत ऑपरेटरविरुद्ध शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी रवींद्र नारायण देशमुख (वय ५२, महसूल सहाय्यक, राहाता तहसील कार्यालय) यांनी तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, दिनांक ११ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता ज्ञानदेव कंस वाकचौरे (वय २३, रा. पिंपळवाडी) नावाचा युवक त्यांच्या कार्यालयात आला. त्याने मिळालेला उत्पन्नाचा दाखला तपासून पाहण्याची विनंती केली. दाखल्यावरील बारकोड क्रमांक तपासला असता तो दाखला प्रत्यक्षात नवनाथ आनारसे या व्यक्तीसाठी दिनांक १९ मे २०२५ रोजी तहसीलदारांनी दिलेला असल्याचे समोर आले.

याबाबतची माहिती देशमुख यांनी तहसीलदार अमोल मोरे यांना दिली. तहसीलदारांनी माहितीची शहानिशा करून तपास केला असता त्यांना सदर दस्तऐवज खोटा आढळून आला. त्यासाठी तहसील कार्यालयाच्या बारकोडचा गैरवापर करण्यात आला आहे. पुढील तपासात स्पष्ट झाले की, ग्रामपंचायत पिंपळवाडीचा ऑपरेटर प्रविण गोरक्षनाथ रोठे (वय २७) याने नवनाथ आनारसे यांना दिलेल्या दाखल्यावरील बारकोड व डिजिटल सहीचा वापर करून तोच दाखला बनावट स्वरूपात ज्ञानदेव वाकचौरे याला दिला.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर रवींद्र देशमुख यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत फसवणूक व अन्य कलमांखाली प्रविण रोठेविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here