अनिल वीर सातारा : कावीळच्या आजारी व्यक्तीला औषधोपचारापासून रोखणाऱ्या व तंत्रमंत्राने कावीळवर उपचार करणाऱ्या फादर चंद्रशेखर गौडाला तातडीने अटक करा. अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पत्रकाद्वारे केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील खडकी येथे डॉक्टरांनी ‘कावीळ’ असल्याचं स्पष्ट निदान करून व औषधं दिले असतानाही डॉक्टरांच्या सल्ल्याऐवजी ‘फादर’च्या मंत्र आणि तेलावर विश्वास ठेवल्याचे ४२ वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला.चर्चमधील ‘फादर’ चंद्रशेखर गौडा यांनी वनिताला कुठलाही आजार झालेला नाही. औषध नाही तर मंत्र लागेल. मी तेलावर मंत्र करतो, तेच पुरेसं आहे. असा दावा करत तिला योग्य उपचारापासून रोखले.
फादरने खोबरेल तेलाच्या बाटलीवर हात ठेवत काही मंत्र म्हणत, पाणी शिंपडले. आणि वनिताला हे तेल कपाळाला लावायला आणि हे तेल प्यायला सांगितले. एवढेच नव्हे तर तर सर्व औषधोपचार घेण्यापासून परावृत्त केले.धक्कादायक म्हणजे फादरने मंतरलेले तेल वनिताने प्राशन केल्याने तिची प्रकृती ढासळली व ४ जुलैला तिला लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ५ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर ९ जुलैला वनिताचा मृत्यू झाला. या सर्व प्रकाराला फादर चंद्रशेखर गौडा जबाबदार असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आपल्या पत्रकात म्हटले आहे.
कावीळ हा योग्य उपचाराने बरा होतो. असे असले तरी त्याला चुकीचे उपचार जीवघेणे ठरतात. हेच कोपरगाव येथील या घटनेतून सिद्ध झालंय. कावीळ हे इतर आजारांचे लक्षण आहे. कावीळचे आजारी व्यक्तीला संतुलित आहार, प्रथिने युक्त पदार्थ व शरीराला आराम या गोष्टींची आवश्यकता असते.
कावीळ झालेल्या व्यक्तीचे यकृत कमजोर असल्याने व नारळ तेलात चरबीचे प्रमाण जास्त असल्याने ते पचायला अतिशय जड असते. कावीळ सारख्या गंभीर आजारी व्यक्तीला औषधोपचारा पासून रोखून तंत्र मंत्राद्वारे चुकीचा उपचार केल्याने फादर चंद्रशेखर गौडा याला जादूटोणाविरोधी कायदा अंतर्गत तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अहिल्यानगरचे कार्याध्यक्ष मधुकर अनाप, राज्य कार्यकारणी सदस्य डॉ. हमीद दाभोलकर, भगवान रणदिवे,श्री व सौ.मंडपे,प्रकाश खटावकर, बंधुत्व पुरस्कार विजेते डॉ दिपक माने व वंदना माने तसेच उदय चव्हाण यांनी केली आहे.