गौतम पब्लिक स्कूलमध्ये जिल्हास्तरीय सुब्रतो फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

0

कोळपेवाडी वार्ताहर :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर व कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूल, गौतमनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४, १५ व १६ जुलै रोजी शाळेच्या भव्य फुटबॉल मैदानावर जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.

या स्पर्धेमध्ये अहिल्यानगर जिल्हयातील विविध शाळांतील १५ वर्षाखालील मुले व १७ वर्षाखालील मुले मुली असे एकूण ३० संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी गौतम पब्लिक स्कूलने आवश्यक असलेली सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. शालेय प्रशासन विशेषतःसंस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे, विश्वस्त आमदार आशुतोष काळे हे नेहमीच विविध खेळांच्या जिल्हास्तरीय, विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करून खेळास व खेळाडूस प्रोत्साहन देण्यासाठी आग्रही असतात. त्यानुसार वर्षभर गौतम पब्लिक स्कूलमध्ये विविध स्पर्धांचे आवर्जून आयोजने केले जात असल्याचे प्राचार्य नूर शेख यांनी सांगितले आहे.

सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका ज्योती शेलार, क्रीडा संचालक व फुटबॉल प्रशिक्षक सुधाकर निलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, हॉलीबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव, क्रिकेट प्रशिक्षक इसाक सय्यद, सर्व हाऊस मास्टर्स मेहनत घेत आहेत.या स्पर्धेत जास्तीत शाळांच्या संघांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे व प्राचार्य नूर शेख यांनी केले आहे.

गौतम पब्लिक स्कूलच्या सुसज्ज मैदानावर नेहमीच हॉकी, फुटबॉल अशा विविध स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले जात आहे.या स्पर्धांना जिल्ह्यासह परजिल्ह्यातील शाळांचा नेहमीच प्रतिसाद मिळतो. त्यामुळे यापुढील काळात गौतम पब्लिक स्कूल राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करणार असून त्यादृष्टीने तयारी सुरु करण्यात आली आहे. -सौ.चैतालीताई काळे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here