श्रीरामपूर शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामास गती देण्याच्या पालकमंत्र्यांचे निर्देश

0

श्रीरामपूर शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

शिर्डी, दि. १२ – श्रीरामपूर शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या १७८ कोटी रुपयांच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेची कामे निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले. श्रीरामपूर शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत पाणी पुरवठा योजनेची पाहणी करून कामांची माहिती घेतली.

२०५१ सालापर्यंत वाढ होणाऱ्या लोकसंख्येचा अंदाज  लक्षात घेऊन २६.३६ दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणीपुरवठा करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सद्यस्थितीत जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर बेडचे खोदकाम पूर्ण झाले असून दगडी सोलिंग व क्रॉकींगचे काम प्रगतीपथावर आहे. वितरणासाठी ५९ कि.मी. पाइपलाइनपैकी १७ कि.मी. पाइपलाइन टाकण्यात आली आहे.

तलावाचे सर्वेक्षण व बोअर कोअर चाचण्या पूर्ण करण्यात आल्या असून खोलीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. तलावातील आरसीसी कामानंतर तळाचा थर प्लास्टिक शीट व वाळूने तयार करण्यात येणार असून त्यासाठी सुमारे दोन महिने लागतील.

शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन ही योजना महत्त्वाची असून कामे वेळेत व दर्जेदारपणे पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री विखे-पाटील यांनी दिले. तसेच नागरी सुविधांसंदर्भात सामाजिक भावना लक्षात घेऊन जबाबदारीने काम करण्याचे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले. यावेळी प्रांताधिकारी किरण सावंत-पाटील, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ,  तसेच अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here