देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील टाकळीमियाॅ येथील ग्रामदैवत असलेल्या मियाँसाहेब बाबा दर्गाची नोंदणी गावातील काही मुस्लिम नागरिकांनी वक्फ बोर्डामध्ये केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत ग्रामस्थांच्या बैठकीत या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. ग्रामस्थांनी संबंधित व्यक्तींना धारेवर धरले. याघटने बाबत समजलेली माहिती अशी की, ८ जुलै २०२५ रोजी टाकळीमियाॅ ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांची विशेष बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत मियासाहेब बाबा दर्गाचे सेवेकरी असलेल्या मुस्लिम समुदायातील नागरिकांमध्ये गेली पाच-सहा वर्षे सुरू असलेल्या अंतर्गत वादावर चर्चा झाली. त्यामुळे हा वाद ग्रामपंचायतीपुढे आल्यानंतर सरपंच लीलाबाई गायकवाड व सदस्यांनी बैठक बोलावली. अध्यक्षस्थानी मियाँसाहेब पतसंस्थेचे अध्यक्ष शामराव निमसे होते.
सेवेकरी असलेल्या मुस्लिम नागरिकांमध्ये झालेल्या वादामुळे बैठकीत बाचाबाची झाली. गावकऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की, तुमचा वाद वैयक्तिक आहे. त्याचा गावच्या परंपरेशी संबंध नाही. परंपरेनुसार ग्रामदैवताची सेवा सन्मान पूर्वक व्हावी, अन्यथा साल काढून घेऊन दुसऱ्याला देण्यात येईल. चर्चेच्या वेळी गावातील काही मुस्लिम व्यक्तींनी दर्गाची थेट वक्त बोर्डात नोंदणी केलाचा खुलासा केला आहे.
त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यावेळी ग्रामस्थांनी त्यांना विचारले की, ही नोंदणी कुणाच्या परवानगीने केली, गावात जातीय तेड निर्माण करण्याचा प्रयत्न का करण्यात आला ? या प्रश्नावर संबंधितांनी दर्ग्याच्या सालावरून निर्माण झालेल्या वादामुळे असे पाऊल उचलल्याचे स्पष्टीकरण दिले. ग्रामस्थांच्या आणि नेत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना संबंधित मुस्लिम नागरिकांनी आपल्याकडून झालेली खूप मान्य केली आहे व त्यानंतर ५०० रुपयांच्या स्टॅम्पवरून नोंदणी मागे घेण्याचा लेखी शब्द दिला असून ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीला सरपंच लीला गायकवाड, उपसरपंच सुवर्णा करपे, शाम निमसे, शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे, राजेंद्र गायकवाड, ज्ञानदेव निमसे, सुरेश निमसे, सुभाष करपे, भाजपचे राजेंद्र करपे व सर्व समाजातील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. दर्गावर यापुढे ट्रस्ट नेमण्यात येणार असून गावातील सर्व समाजांच्या नागरिकांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच दर्गा संबंधित जे काही निर्णय घ्यायचे असतील त्यावेळी गावातील नागरिकांची बैठक आयोजित करून या ट्रस्ट मार्फत ते निर्णय घेण्यात येतील, असे यावेळी सर्वानुमते ठराव करण्यात आला. याबाबत ग्रामपंचायतीकडून या विषयावर विशेष ग्रामसभा घेण्यात येईल. त्या ग्रामसभेत सर्वानुमते देवस्थान बाबत निर्णय घेण्यात येईल असे सरपंच लीलाबाई गायकवाड यांनी सांगितले.