कोपरगाव प्रतिनिधी :–
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेले महाराष्ट्रातील बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण असून, या ऐतिहासिक निर्णयाचे कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे यांनी मनःपूर्वक स्वागत करत भारतीय शासनाचे आणि विशेषतः महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन व आभार मानले आहेत.
या निर्णयामुळे शिवकालीन शौर्य, स्वाभिमान आणि सर्जनशीलतेचा वारसा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचेल आणि नव्या पिढीला आपल्या इतिहासाचा अभिमान वाटेल, असे युवानेते विवेक कोल्हे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. त्यांनी नमूद केले की, हे केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी गौरवाचे क्षण आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले हे किल्ले केवळ लढाया किंवा प्रशासनाचे केंद्र नव्हते, तर धैर्य, दूरदृष्टी आणि राष्ट्रनिर्मितीच्या प्रेरणेची जिवंत उदाहरणे होती.
जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्यामुळे या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी अधिक निधी, तांत्रिक सहाय्य आणि जागतिक पातळीवर पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
युवानेते विवेक कोल्हे यांनी असेही आवर्जून सांगितले की, “शिवाजी महाराज हे आपल्या संस्कृतीचे आणि अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांचे कार्य आणि विचार आजही लोकांना प्रेरणा देतात. हे किल्ले जागतिक पातळीवर पोहचणे म्हणजे शिवछत्रपतींच्या कार्याचा जागतिक सन्मान आहे.”
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्र सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महाराष्ट्र शासन, पुरातत्त्व विभाग व इतर संबंधित संस्थांचे विशेष अभिनंदन करून, युवानेते विवेक कोल्हे यांनी या किल्ल्यांचे संवर्धन, स्वच्छता आणि शाश्वत पर्यटन विकासासाठी जनसहभाग वाढवण्याचे आवाहन देखील केले. आम्ही संजीवनी युवा प्रतिष्ठान अंतर्गत गड किल्ले स्वच्छता मोहिमा राबवत असतो त्यावेळी युवकांना निर्माण होणारी ऊर्जा अनुभवत असतो.या ऐतिहासिक निर्णयामुळे नवी चेतना युवकांना निर्माण झाली आहे.