गिर्यारोहक लहू उघडे यांची पहिल्याच प्रयत्नात ‘एव्हरेस्ट’ मोहिम फत्ते
नगर -गरीब फेरीवाल्याच्या कुटुंबातील गिर्यारोहक लहू उघडे यांनी जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट पहिल्या प्रयत्नात सर केले. सुरेंद्र शेळके या दिग्गज गिर्यारोहकाच्या मार्गदर्शनाखाली व तीव्र ईच्छाशक्तीच्या बळावर लहू उघडे याने एव्हरेस्टवर तिरंगा आणि भगवा फडकवला. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जगातील सर्वोच्च शिखरावर नेऊन बालपणापासून उराशी बाळगलेले एक स्वप्न पूर्ण केले. कष्ट उपसण्याची तयारी असेल तर एव्हरेस्टही सर होऊ शकते. एस. एल एडव्हेंचर आणि ट्रेकयात्री गिर्यारोहण संस्थेने त्यांच्या एव्हरेस्ट मोहिमेसाठी सहकार्य केले. संस्थेचे रविंद्र चोभे, अक्षय भापकर, अमित सोनग्रा, आकाश पातकळ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
सिंहगड येथे लहू उघडे याचे वडिल हातगाडीवर भाजीपाला-फळे विक्री करतात. सिंहगड छत्रपती शिवरायांच्या काटक मावळ्यांची भूमी आहे. डोंगरदर्यात बालपण गेल्याने उपजतच सह्याद्रीतील कातळ कडे सर करण्याची जिद्द निर्माण झाली. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे प्रेरणास्थान. गिर्यारोहण हा साहसी खेळ लहू उघडे यांना बालपणीपासूनच आकर्षित करत आला. हिमालय व सह्याद्रीतील अनेक शिखरे सर केल्यानंतर खुणावत होते ते जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट. पण या स्वप्नपूर्तीसाठी अनंत अडचणी पुढे उभ्या होत्या. शारीरिक तंदुरुस्ती व चढाईचा सराव व्हावा यासाठी दिवसातून दोन वेळा पाठीवर वीस किलो वजन घेऊन सिंहगड किल्ला चढायचा आणि उतरायचा हा दिनक्रम गेली दोन वर्ष सुरु होता. सोबतच एकीकडे सह्याद्रीतील कातळ कडे, सुळके प्रस्तरारोहण करण्याचा सराव त्यामुळे शारीरिक व मानसिक तयारी जबरदस्त झाली होती. गिर्यारोहणातील तंत्रशुद्ध प्रशिक्षण त्यांनी जिद्दीने पूर्ण केले.
मोहिमेसाठी भरायला लागणार्या फीसमध्ये काही रक्कम कमी होती आणि ती मित्रमंडळी मागून पाठवणार होते. सोबतच्या टीमचे सर्वांचे पैसे जमा करून झाले होते पण लहूची आवश्यक रक्कम अजूनही जमा होत नव्हती. पत्नी, मित्र अनेक ठिकाणी फिरून मदतीसाठी अपील करत होते. शेवटी मुदत संपण्याच्या दोन दिवस आधी आवश्यक रक्कम जमा झाली आणि एव्हरेस्टचा मार्ग खुला झाला.