सोनेवाडी परिसरात बिबट्याकडून दिवसाआड पशुधनाची शिकार.

0

शेतकरी त्रस्त मात्र वनविभागाचे दुर्लक्ष 

कोपरगाव ( वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी परिसरात गेल्या सहा महिन्यापासून बिबट्याची दहशत पसरली आहे. सिरीयल किलर प्रमाणे बिबट्या परिसरातील पाळीव प्राण्यांची शिकार करत आहे. वन विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष असून शेतकऱ्यांनीही आपल्या शिकार झालेल्या प्राण्यांच्या पंचनाम्यासाठी वनविभागाची वाट न पाहता मृतप्राण्यांना माती आड केले आहे. वन विभागाचे याकडे साफ दुर्लक्ष असून वेळोवेळी सोनेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच शकुंतला गुडघे पोलीस पाटील दगू गुडघे व अन्य सामाजिक कार्यकर्त्यांकडून या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. मात्र आमच्याकडे कर्मचारी कमी असून पिंजरा ने आन करण्यासाठी साधन देखील तुम्हीच उपलब्ध करावे असे उत्तर अनेक वेळा मिळाल्याने‌ शेतकरी व ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.या आठवड्यात तर बिबट्याने कामालाच केली असून सिरीयल किलर प्रमाणे त्याने वाड्या वस्तीवर पाळीव प्राण्यांवर हल्ला करण्याचे सत्र सुरू ठेवले आहे. सुरेश कारभारी साबळे यांच्या गोठ्यातील तब्बल पाच शेळ्या व एक पाळीव कुत्रे या बिबट्याने शिकार करून फस्त केले आहे. तर दुसऱ्या दिवशी धर्मा किसन होन व प्रल्हाद किसन जावळे यांच्या घराजवळ बांधलेल्या प्रत्येकी एक एक शेळीचा जीव या बिबट्याने घेतला आहे. तर अरविंद ठकाजी घोंगडे, सिताराम पोपट माळी यांच्याही शेळ्या बिबट्याने शिकार करून फस्त केल्या. एवढ्या वरच बिबट्याची दहशत थांबली नाही तर बाळासाहेब माळी यांचे पाळीव कुत्रे व भिमराज किसन जायपत्रे यांच्या दोन शेळ्या या बिबट्याने फस्त केले आहेत.शिकार झाल्यानंतर या शेतकऱ्यांनी वन विभागाचे या गोष्टीकडे पुरत दुर्लक्ष असल्याने वन विभागाला माहिती न देता हे मृत पाळीव प्राणी जमिनीत खड्डा घेऊन पुरून टाकले आहे.आता तरी वनविभागाने या गोष्टीकडे गांभीर्याने बघावे व सोनेवाडी परिसरातील बिबट्याने हल्ला केलेल्या पाळीव प्राण्यांच्या मालकांच्या शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना आधार द्यावा व या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सोनेवाडी परिसरातील दोन तीन भागात पिंजरा लावावा अशी मागणी परिसरातून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here