नवी दिल्ली : युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) अर्थात जागतिक कुस्ती संघटनेनं भारतीय महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाची दखल घेतलीय. एक निवेदन जारी करत जागतिक कुस्ती संघटनेनं दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंना केलेल्या अटकेच्या कारवाईचा निषेध केलाय.
28 मे 2023 रोजी दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरवर कुस्तीपटू आंदोलन करत असताना, त्यांना तिथून ताब्यात घेतलं. यावेळी काही कुस्तीपटूंना फरफटत नेलं. त्याच दिवशी संध्याकाळी ताब्यात घेतलेल्या कुस्तीपटूंना सोडण्यात आलं. मात्र, या कारवाईवर भारतासह जगभरातून संताप व्यक्त करण्यात आला आणि निषेध नोंदवण्यात आला.
जागतिक कुस्ती संघटनेनं आपल्या निवेदनात म्हटलंय की, “नुकतीच घडलेली घटना चिंताजनक आहे. धरणे आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी तात्पुरते ताब्यात घेतले ही बाब अधिक चिंताजनक आहे. ज्या ठिकाणी ते महिनाभर आंदोलन करत होते, तिथे देखील प्रशासनाने कारवाई केली. कुस्तीपटूंना दिलेल्या वागणुकीचा आणि अटकेचा UWW तीव्र निषेध करत आहे.
महिला कुस्तीपटू ज्यांच्यावर कारवाईसाठी गेले काही महिने आंदोलन करत आहेत, त्या भाजप खासदार ब्रिजभूषण यांच्याबाबत आतापर्यंत झालेल्या तपासावर देखील जागतिक कुस्ती संघटनेनं निराशा व्यक्त केलीय.
जागतिक कुस्ती संघटनेनं संबंधित अधिकाऱ्यांना या आरोपांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका 45 दिवसांच्या आत न घेतल्यास बरखास्त करण्याचा इशारा देखील जागतिक कुस्ती संघटनेनं दिलाय.
याचबरोबर भारताचा माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनीही कुस्तीपटूंवरील कारवाईचा निषेध व्यक्त करत चिंता व्यक्त केलीय. हा प्रश्न सोडण्यासाठी संवादाचा मार्ग असू शकतो, असंही कुंबळे म्हणाला.