अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करून अभिवादन
पवारांना राम शिंदे पेक्षा जास्त राजकारण कळत असे रोहित पवारांनी राम शिंदेना खोचक प्रत्युत्तर ;आम्ही समाजकारण करतो राम शिंदे यांना राजकारण शिवाय काय समजत नाही – आ. रोहित पवार
जामखेड तालुका प्रतिनिधी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या पूर्वसंध्येला काल रात्री चौंडी इथं क्षिप्रा, नर्मदा, गोदावरी, चंद्रभागा, रामेश्वर, तापी आणि कृष्णा या सात नद्यांचं पाणी आणि राज्याच्या विविध भागात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या बारवमधील कार्यकर्त्यांनी आणलेल्या पवित्र जलाने मतदारसंघातील जोडप्यांच्या हस्ते महापूजा आणि जलाभिषेक करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करुन अभिवादन केलं.
चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त २९८ फटाक्यांची एक तास नेत्रदीपक आतषबाजी करुन राज्यभरातील शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास अभिवादन केलं. यावेळी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कर्मभूमीतून उज्जैन येथून आणलेल्या हत्तीची चौंडीमध्ये पूजा करण्यात आली.
चौंडी येथील महादेवाचं मंदिर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक यावर नागरिकांनी आणि आपण सर्वांनी मिळून डोळ्यांचे पारणे फेडणारी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. अशा प्रकारे पहिल्यांदाच रात्री १२ वाजता सर्वांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करता आली, याचं आमदार रोहित पवार यांनी समाधान व्यक्त केलं आहे.
चौंडीतील सीना नदीपात्रात ४१ हजार पणत्यांपासून (५० बाय ५० साईझ) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची थ्रीडी प्रतिकृती साकारून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीची अनोखी मानवंदना देण्यात आलीय. कलाकार उद्देश पघळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी साकारलेली ही प्रतिकृती.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र आळंदी येथील ह.भ.प. गडदे महाराज यांनी किर्तन सेवा बजावली. याचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. राज्याच्या व देशाच्या विविध भागातून चौंडीमध्ये येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
“पवारांना राम शिंदेंपेक्षा जास्त राजकारण कळतं”
दरम्यान, यासंदर्भात माध्यमांशी बोलताना रोहित पवारांनी राम शिंदेंना खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. “राजकारणाच्या बाबतीत मला वाटतं की पवारांना त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे. त्यामुळे पवार कधीही सामाजिक कार्यक्रमात किंवा जयंतीच्या कार्यक्रमात राजकारण करत नाहीत. ज्या ठिकाणी खरंच राजकारण करायला हवं, तिथेच पवार राजकारण करतात. राजकारणाच्या बाबतीत पवारांच्या नादी कुणीही लागू नये”, असं रोहित पवार म्हणाले.
“आम्ही समाजकारण दाखवून देतोय, पण ते…”
“राजकारण कोण करतंय? कार्यकर्ता म्हणून इथे येणाऱ्या लोकांना सेवा मिळतेय की नाही हे आम्ही बघतोय. हे सगळं जयंती साजरी करण्याबाबतच्या प्रेमाचा प्रकार आहे. याला जर ते राजकारण म्हणत असतील, तर तो त्यांचा विषय आहे. त्यांना राजकारणाशिवाय दुसरं काही कळत नाही. आम्हाला समाजकारणाशिवाय काही कळत नाही. समाजकारण काय असतं हे आम्ही दाखवून देतोय. राजकारण काय असतं हे ते त्यांच्या वक्तव्यावरून दाखवून देतायत”, असं रोहित पवार यावेळी म्हणाले. कर्जत-जामखेडमधील राम शिंदे विरुद्ध रोहित पवार हा राजकीय कलगीतुरा महाराष्ट्राच्या राजकारणाला नवा नाही. नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही त्याचा प्रभाव दिसून आला. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने पुन्हा एकदा हे दोन्ही नेते एकमेकांना भिडले आहेत. यंदा कर्जत-जामखेडऐवजी चौंडीमध्ये हे दोघे नेते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. चौंडीमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने या दोघांनी एकमेकांवर खोचक टीका केली आहे.