देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
“आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना” अंतर्गत महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्यरत झालेली असून या योजने अंतर्गत निवडक हॉस्पिटलमध्ये पाचं लाख रुपयां पर्यंत मोफत औषधोपचार मिळणार आहेत. देवळाली प्रवरा शहरातील नागरिकांनी आरोग्य पञिका काढून घ्यावी,असे आवाहन देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत यांनी केले आहे.
आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना” अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील ४४ रुग्णालय असून १२०९ प्रकारच्या विविध आजारावर मोफत औषधोपचार केले जाणार आहेत. या आजारामध्ये हृदय विकार, मेंदू विकार, किडनी विकार, अपघात, कर्करोग इत्यादी प्रकारच्या गंभीर आजारावर उपचार व शस्त्रक्रिया मोफत केले जातात. या योजनेचा लाभ हा आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थींना दिला जातो. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे देवळाली प्रवरा शहरांमध्ये 12 हजार लाभार्थी असून या लाभार्थ्यांना लाभ घेण्यासाठी आयुष्यमान आरोग्य पञिका असणे आवश्यक आहे.
शासनाने उपलब्ध करून दिलेल्या यादीतील नागरिकांनी आरोग्य पञिका काढून घेणे आवश्यक आहे.आरोग्य पञिका काढून घेण्यासाठी प्रधानमंत्री यांचे या योजनेचे यापूर्वी आलेले हिरवे पत्र किंवा रेशन कार्ड, आधार कार्ड व मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. देवळाली प्रवरा शहरातील नागरिकांचे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे आरोग्य पञिका काढण्यासाठी महा-ई-सेवा केंद्र,स्वामी समर्थ कॉम्प्युटर्स, बाजार तळ,आनंद इन्फोटेक, सोसायटी गाळे,महा-ई-सेवा केंद्र, शनी मंदिरासमोर व राहुरी फॅक्टरी येथील शिव कॉम्प्युटर्स या ठिकाणी सुविधा उपलब्ध होत आहेत.
यासंदर्भात नुकतीच मुख्याधिकारी अजित निकत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झालेली असून या बैठकीस सेतु, सुविधा केंद्र चालक अविनाश जाधव, सचिन गायकवाड, विजय दळवी, तुषार कदम, प्रशासकीय अधिकारी सुदर्शन जवक, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे बी. एस. डमाळे, नंदु शिरसाट इत्यादी उपस्थित होते.