कोपरगावकरांनी सुवर्णक्षणाचे साक्षीदार व्हावे – संदीप वर्पे

0

कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील नागरिकांचा मागील अनेक वर्षापासुनचा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी आ. आशुतोष काळे यांच्या अथक परिश्रमातून ५ नंबर साठवण तलावाचे प्रगतीपथावर आहे. या कामाचा अतिशय महत्वाचा  टप्पा  अर्थात  साठवण तलावाच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा रविवार (दि.११) रोजी शुभारंभ होत आहे. या ऐतिहासिक सुवर्णक्षणाचे कोपरगाव करांनी साक्षीदार व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदिप वर्पे यांनी केले आहे.

कोपरगाव येथील गौतम बँकेच्या सभागृहात कोपरगाव राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शुक्रवार (दि.०९) रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते. ते म्हणाले की, मागील कित्येक वर्षापासून कोपरगाव शहरातील नागरिकांना नियमित पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांनी घरासमोर ठेवलेल्या पाण्याच्या टाक्या आ. आशुतोष काळे यांनी ज्यावेळी पाहिल्या तेव्हापासून त्यांनी कोपरगाव शहरवासियांना नियमित पिण्याचे पाणी मिळावे हे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी सत्ता नसतांना देखील ५ नंबर साठवण तलावाचा प्रश्न लावून धरला होता व सत्ता मिळताच दोनच महिन्यात प्रत्यक्षात कामास सुरुवात केली. या साठवण तलावाचे काम पूर्ण होण्याच्या दृष्टीने काँक्रिटीकरण एक महत्वाचे पाऊल आहे. कोपरगावच्या नागरिकांना नियमित पाणी मिळण्याच्या स्वप्नपूर्तीची वाटचाल सुरु झाली असून लवकरच हे स्वप्न सत्यात उतरणार आहे.त्यामुळे अशा ऐतिहासिक सुवर्णक्षणाचे कोपरगाव करांनी साक्षीदार व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी शहराध्यक्ष सुनील गंगुले म्हणाले की, कोपरगावकरांच्या पिण्याच्या पाण्याची सातत्याने हेळसांड असल्यामुळे वर्षानुवर्ष शहरातील नागरिक त्रस्त आहेत. प्रत्येक निवडणुकीत हा प्रश्न गाजत राहिला. कित्येक वर्ष कोपरगावच्या पिण्याच्या पाण्याचे राजकारण करून राजकीय पोळी भाजली गेली मात्र आ.आशुतोष काळे यांनी पद नसतांना देखील शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरून केलेला संघर्ष जनतेने पाहिला आहे. त्यामुळे जनतेने मोठ्या विश्वासाने त्यांच्याकडे विकासाची सूत्रे सोपविली. तेव्हापासून  त्यांनी कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी ५ नंबर साठवण तलावाचे काम सुरु केले. त्यामध्ये देखील कोर्टकचेरी, राजकीय खोडा अशा सर्व अडीअडचणीतून मार्ग काढून त्यावर  मात करून या साठवण तलावासाठी १३१.२४ कोटी निधी मिळविण्यात त्यांना यश आले. शहरातील जनतेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी अथक पाठपुरावा करून स्वप्नाला आकार दिला. स्वप्नपुर्तीकडे टाकलेले हे एक पाऊल असून या सुवर्णक्षणाचे साक्षीदार व्हा असे आवाहन केले.

याप्रसंगी माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, कृष्णा आढाव, प्रशांत वाबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी नगरसेवक संदीप पगारे, राजेंद्र वाघचौरे, सुनील शिलेदार,अजीज शेख, दिनकर खरे, फकीर कुरेशी, ॲड. विद्यासागर शिंदे, अंबादास वडांगळे, चंद्रशेखर म्हस्के, डॉ. तुषार गलांडे, संतोष शेलार यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

चौकट :– कोपरगाव नगरपालिकेच्या एक ते चार साठवण तलावाची क्षमता ६८ कोटी लिटर आहे. तलावात वर्षानुवर्षापासून गाळ साचल्याने हि क्षमता निम्म्यावर अर्थात जवळपास २५ ते ३० कोटी लिटरवर आली आहे. ५ नं. साठवण तलावाची क्षमता ४० कोटी लिटर असून एक ते चार साठवण तलावातील गाळ काढल्यानंतर एक ते पाच साठवण तलावाची पाणी क्षमता १०८ कोटी लिटरवर पोहोचणार आहे. एक मुख्य जलकुंभ व त्याला जोडून चार नवीन जलकुंभ होणार असून त्यांचे काम देखील प्रगतीपथावर आहे. शहराला दररोज दीड कोटी लिटर पाण्याची आवश्यकता आहे. दररोज दीड कोटी प्रमाणे साठ दिवसांसाठी ९० कोटी लिटर पाण्याची आज रोजी आवश्यकता आहे. भविष्यातील २०५२ पर्यंतच्या लोकसंख्या गृहीत धरून १०८ कोटी लिटर  पाणी साठा उपलब्ध होणार आहे. नवीन ९५ किलोमीटरच्या वितरण व्यवस्थेचे काम सुरु असून ३०कि.मी. काम पूर्ण झाले आहे. नवीन वितरण व्यवस्थेमुळे गळती व लिकेजचे प्रमाण कमी होणार आहे. दर दोन महिन्यांनी आवर्तन येत असल्यामुळे त्यामुळे ५ नंबर साठवण तलावाचे व चारही तलावातील गाळ काढण्याचे काम पूर्ण होवून आवश्यक पाणी साठा उपलब्ध होणार असल्यामुळे नागरिकांना नियमित पाणी मिळेल –

संदिप वर्पे (रा.काँ. जिल्हा कार्याध्यक्ष)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here