रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार ‘लँडफॉल’ , ७० हजाराच्यावर लोकांचे केले तात्पुरते स्वरूपात स्थलांतर … सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीला ‘रेड अलर्ट’ जारी
मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेलं बिपरजॉय हे चक्रीवादळ आज (15 जून) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास गुजरात किनाऱ्याला धडकलं. या प्रक्रियेला लँडफॉल असं संबोधलं जातं. जाखौ बंदराजवळ हे लँडफॉल होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून रात्री दहापर्यंत ते सुरू राहील, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाकिस्तानातील कराची किनारपट्टीजवळही त्याचा मोठा प्रभाव दिसून येईल.
हे वादळ 120-130 ते 145 किमी प्रतितास वेगाने किनारपट्टीला धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अतिशय तीव्र स्वरुपाचे असलेले चक्रीवादळ बिपरजॉय अरबी समुद्रातून ईशान्येकडे जात असून त्यामुळे सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीला ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
सध्या या वादळामुळे गुजरातच्या किनारी भागातील वातावरण वेगाने बदलत आहे. द्वारका, जामनगर, मोरबी आणि राजकोट परिसरातील जिल्ह्यांमध्ये जोराचा पाऊस आणि वेगवान वारे वाहत असल्याच्या बातम्या आहेत. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांच्या माहितीनुसार, अनेक गावांमध्ये वीजेचे खांब कोसळून पडल्याची बातमी आहे.
वादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांना धोक्याची सूचना दिलेली आहे. यामध्ये किनारी भागातील केरळ, महाराष्ट्र आणि गुजरातसह राजस्थानलाही अलर्ट जारी करण्यात आलं आहे.
गुजरातसह मुंबईतील परिस्थितीही बिकट होत आहे. किनारी भागातील चौपाट्यांवर जाण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राच्या किनारी भागावरही या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येत आहे. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात याचा प्रभाव दिसून येत आहे. येथील तटबंदीवर जोरदार लाटा आदळत आहेत. सध्या चौपाटीवर न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.