देवळाली प्रवरा / प्रतिनिधी :
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील मुस्लिम बांधवानी आषाढी एकादशीच्या दिवशीच बकरी ईद येत असल्याने या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय घेत सर्व धर्मीयांमध्ये एकात्मतेचा संदेश दिला आहे. मुस्लिम बांधवांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महाराष्ट्रासह इतर राजयातील् वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील आराध्य दैवत श्री विठ्ठलाची देवशयनी एकादशी निमित्त लाखो भाविकांच्या उपस्थितीत सोहळा पार पडत असतो. गावातील एकोपा वाढावा तसेच एकामेकांच्या धर्माविषयी प्रेम आपुलकी निर्माण व्हावी म्हणून देवळाली प्रवरा शहरातील मुस्लिम बांधवानी एकादशीच्या दिवशी बकरी ईद हा त्यांचा पवित्र सण असूनही कुठल्याही प्रकारची कुर्बानी देणार नसल्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे. बकरी ईदच्या निमित्ताने केवळ ईदगाह मैदानावर नमाज पठण व शुभेच्छा दिल्या जाणार आहेत.
राहुरीचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी नुकतीच देवळाली शहरातील मुस्लिम बांधवांची बैठक घेतली होती.मुस्लिम समाजाच्या या निर्णयाचे शहरातील सर्व हिंदू बांधवांनी कौतुक केले आहे.