देवळाली प्रवरा /प्रतिनिधी :
राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे चोरी किंवा घरफोडी करण्याच्या उद्देशाने रात्रीच्या दरम्यान संशयितरित्या फिरत असलेल्या एका तरुणाला राहुरी पोलीस पथकाने ताब्यात घेऊन गजाआड केले.
राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक दिपक रामदास फुंदे, वय ३३ वर्षे, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र लोखंडे, पोलिस शिपाई सोमनाथ जायभाय, पोलिस नाईक देविदास कोकाटे, दिपक फुंदे आदि पोलिस पथक राहुरी पोलिस ठाणे हद्दीत कोल्हार खुर्द येथे रात्रीच्या दरम्यान गस्त घालत होते. तेव्हा कोल्हार खुर्द परिसरात असलेल्या हाॅटेल रायगडचे आडोशाला, एक इसम संशयित रित्या चोरी करण्याचे उद्देशाने मिळून आला. त्याचे नाव गाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव राहुल गोविंद वाघमोरे, वय २५ वर्षे, रा- रांजणगाव गाढवे, ता. राहाता, जि. अहमदनगर असे सांगीतले.
पोलिस पथकाने त्याची अधिक चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ एक चावीचा जुडगा, एक स्क्रू ड्रायव्हर अशा घरफोडी व चोरी करण्याचे वस्तू मिळून आल्या. पोलिस पथकाने सदर मुद्देमाल ताब्यात घेऊन संशयीत आरोपीला गजाआड केले. पोलिस नाईक दिपक रामदास फुंदे यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी राहुल गोविंद वाघमारे, वय २५ वर्षे, रा- रांजणगाव गाढवे, ता. राहाता, जि. अहमदनगर. याच्यावर गुन्हा रजि. नं. ७०१/२०२३ महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम १२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.