कोल्हापूर : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे काही आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. सरकारमध्ये सहभागी होताच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाचा खरा अध्याय सुरू झाला. अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील, असे दावे राष्ट्रवादीच्या काही आमदारांकडून वारंवार करण्यात आले. या दाव्यांवर चर्चा होत असतानाच आता स्वराज्य संघटनेचे संस्थापक छत्रपती संभाजीराजे यांनी मोठा दावा केला आहे. अजित पवार हे मुख्यमंत्री होणार नाहीत, असा दावा छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे. संभाजीराजे रविवारी मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.
नेमकं काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?
मी चॅलेंज देऊन सांगतो, की अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत. राष्ट्रवादीचे सर्व आमदार शरद पवारांकडे परततील, हा सर्व ठरवून झालेला प्लान आहे, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे हेच राहणार. अजित पवार यांना मुख्यमंत्री केले जाणार नाही. हे केवळ लोकसभा निवडणुकांसाठी जुळविलेले गणित आहे, असंही ते म्हणाले.
महाराष्ट्रात अजित पवार पार्ट-2 पाहायला मिळणार?
संभाजीराजेंच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा शरद पवारांकडे जातील का? महाराष्ट्रात अजित पवार पार्ट-2 पाहायला मिळणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, अगदी दोन-तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी अजित पवार हे आमचे नेते आहेत. राष्ट्रवादीत फूट पडली नाही, असं विधान केलं होतं.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील अशाच प्रकारचं विधान केलं. यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये नाराजी दिसून आली होती. यानंतर शरद पवार यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत आपण असं बोललो नाही, असं स्पष्ट केलं होतं.
दरम्यान, यावर काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी प्रतिक्रिया दिली होती. “शरद पवार यांच्या विधानाने असं लक्षात येतं की, महाराष्ट्राला आणि देशाला अजित पवार पार्ट-2 बघायला मिळणार आहे. त्याचं कारण असं आहे, शरद पवार यांनी असं स्पष्ट केलं आहे, की काहीही झालं तर मी भाजपसोबत जाणार नाही”, असं अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे.