मराठवाड्याच्या विकासाच्या घोषणा होतात पण त्याची अंमलबजावणी कालःमर्यादेत होत नाही

0

पैठण,दिं.५.(प्रतिनिधी) : मराठवाड्याच्या विकासाच्या घोषणा होतात पण त्याची अंमलबजावणी कालःमर्यादेत होत नाही असा अनुभव आहे त्याची उत्तम उदाहरण म्हणजे पैठण येथील संतपीठ, ज्ञानेश्वर उद्यानात जागा असूनही अपुऱ्या जागेत बाळासाहेब पाटील संग्रहालय चालविणे, पैठण औद्योगिक नगरी स्थापन करण्यात टाळाटाळ करणे, जायकवाडी प्रकल्पाच्या विविध योजना वेळेवर पूर्ण न करणे, ई.औरंगाबाद येथे होत असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने खालील मागण्याची पूर्तता तथा अंमलबजावणी कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालय विभागीय आयुक्त कार्यालय तथा संबधीत विभागाने करावी अशी मागणी प्रतिसाद संघटनेने केली आहे.

                     मागण्या:

१.गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून रेंगाळत पडलेल्या मराठवाडा विकास बेचाळीस कलमांतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या पैठण येथील ज्ञानेश्वर उद्यानातील बाळासाहेब पाटील पुराण-वस्तू संग्रहालयासाठी संग्रहालयाच्या अवतीभवतीची तथा आजूबाजूची पडून असलेली दोन एकर जमीन संग्रहालयाच्या विस्तारासाठी मराठवाडा गोदावरी विकास पाटबंधारे महामंडळ यांनी तात्काळ पुराण वस्तू संग्रहालय पैठण यांच्या ताब्यात द्यावी.

२. पैठण येथील संत पिठाचा मराठवाडा विकासाच्या 42 योजनेअंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे. असे असतानाही गेल्या 35 वर्षापासून अतिशय संत गतीने वाटचाल करीत असलेल्या संत पिठाच्या सर्वच्या सर्व इमारती सार्वजनिक बांधकाम विभागाने आता एकाच वेळी एकाच टप्प्यात काल मर्यादित उभाराव्यात.

३. संत पिठाच्या सर्व श्रेणीतील अभ्यासक्रमासाठी तसेच संत पिठाच्या सर्वांगीण विकासासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला दरवर्षी लागणारा आवश्यक तथा पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची कारवाई करण्यात यावी.

४. दिनांक 9 व 10 एप्रिल 2002 या दोन दिवशीय औरंगाबाद मध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख मंत्रिमंडळाची बैठक झाली होती त्या बैठकीत पैठण येथील औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रामध्ये औद्योगिक नगरी स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे गेल्या वीस वर्षात या कामात कोणतीही प्रगती झाली नाही औद्योगिक नगरी स्थापन करण्याची कारवाई काल मर्यादित करण्यात यावी तसेच पैठण औद्योगिक विकास महामंडळाच्या संपूर्ण जागेत कारखाने उभारणीचा तात्काळ कोठा पूर्ण करण्यात यावा.

५. पाटबंधारे खात्याच्या अधिपत्यात खालील यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या, पर्यटकांचे आकर्षक ठरलेल्या पैठण येथील प्रसिद्ध ज्ञानेश्वर उद्यान सद्यस्थितीत भकास झालेले आहे आता या उद्यानाचा प्राणीसंग्रहालयासह सर्वांगीण विकास कालमर्यादेत व्हावा.

६. पैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण टप्पा क्रमांक दोन चे काम गेल्या अनेक वर्षापासून संत गतीने चालू आहे हा ही प्रकल्प सिंचन विभागाने काल मर्यादित पुर्ण करावा.

७. शुभ्रमण्यम कमिटी अहवालानुसार पैठण तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका मानण्यात आला आहे त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी व पैठण तालुक्याच्या विकासासाठी विशेष योजना राबविण्यासाठी मराठवाडा कृषि मुख्यालय व महसूल विभागाने पुढाकार घ्यावा.

८. पैठण येथील प्रवासी बस स्थानक पूर्णतः निकामे झाले असून पडावयास आले आहे तात्काळ नवीन बस स्थानक  उभारण्यासाठी जिल्हा परिवहन विभागाने तात्काळ कारवाई करावी.

९. जायकवाडी प्रकल्पाच्या पैठणच्या नाथसागरात भविष्यातील प्रत्येक वर्षात आवश्यक तथा पुरेसे पाणी साठविलेले राहील याची विशेष दक्षता मराठवाडा गोदावरी विकास पाटबंधारे महामंडळाने घ्यावी.

१०. पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागरावरील जलविद्युत केंद्र गेल्या अनेक महिन्यापासून बंद आहे याबाबत मराठवाडा गोदावरी विकास महामंडळाने तात्काळ कारवाई करावी.

११. पैठण येथे वैद्यकीय शिक्षण विभागाकडून 100 खाटाचे रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे तेव्हा शंभर खाटाच्या रुग्णालयाच्या सर्व इमारती एकाच वेळी,एकाच टप्प्यात तात्काळ उभारण्यात याव्यात.

१२. ऐतिहासिक तथा प्राचीन महावस्त्र म्हणून पैठणची पैठणी जगात प्रसिद्ध आहे सद्यस्थितीत पैठण येथील शासकीय लघु केंद्रातून ऐतिहासिक पैठणी जिवंत राहावी म्हणून पैठणी विणकाम प्रशिक्षण केंद्र सुरू आहे या प्रशिक्षण केंद्राचे (महावस्त्र निर्मिती) महाविद्यालयात रूपांतर करण्यात यावे व वीणकाम करणाऱ्या कारागिरांना समाधानकारक मानधन देण्यात यावे.

१३. पैठण येथील रंगाराहटी परिसरातील जुन्या तहसील जागेत पाण्याच्या टाकीचे बांधकाम 75 % टक्के झालेले आहे उर्वरित काम जीवन प्राधिकरणाने तात्काळ पूर्ण करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here