कोंडवे येथे शाळकरी मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

0

सातारा – कोंडवे (ता. सातारा) येथील एका शाळकरी मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. सुशांत नीलेश कांबळे (वय 12) असे आत्महत्या केलेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुशांत हा शाहूपुरीतील एका शाळेत इयत्ता सहावीमध्ये शिकत होता. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता तो क्‍लासवरून घरी आला. त्यावेळी त्याची आई आणि वडील कामावर गेले होते. घराची एक चावी त्याच्याजवळ होती. दरवाजा उघडून तो घरात गेला. तत्पूर्वी त्याने शेजारील काकूंना “मला गणपतीच्या आरतीला बोलवा. तोपर्यंत मी जेवण करतो,’ असे सांगितले. सकाळी साडेअकरापर्यंत घरात तो एकटाच जेवला. त्यानंतर त्याने किचनमध्ये दोरीच्या साह्याने गळफास घेतला.

बराचवेळ तो घरातून बाहेर आला नाही म्हणून त्याचे मित्र त्याला पहायला घरात गेले. त्यावेळी तो त्यांना लटकलेल्या स्थितीत दिसला. हे पाहताच मुलांनी आरडाओरड केली. काहींनी सुशांतच्या आई-वडिलांना त्याची माहिती दिली. सातारा तालुका पोलीस आणि त्याचे आई वडिलही तातडीने घटनास्थळी आले. त्याच्या गळ्याचा फास काढून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.सुशांतची आई धुण्याभांड्याची तर वडील गवंडी काम करतात. ते दोघे रोज सकाळी घराबाहेर पडतात. नेहमीप्रमाणे सुशांतही क्‍लासला जात होता. घरात कसलाही वाद झाला नाही. असे असताना त्याने कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले, या विचाराने त्याच्या घरातल्यांना अस्वस्थ करून सोडले आहे. शाळेत किंवा गावात त्याची कोणासोबत भांडणे झाली होती का, त्याला कोणी रागवले का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. योगेश पोपट कांबळे (वय 37, रा. कोंडवे, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली असून, पोलीस नाईक प्रवीण वायदंडे अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here