मुंबई : नेपाळच्या मर्स्यांगदी नदीत महाराष्ट्रातील प्रवाशांची बस कोसळली आहे. तनाहूचे मुख्य जिल्हा अधिकारी जनार्दन गौतम यांनी या घटनेत 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. तसेच 16 लोकांवर उपचार सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.
बसमध्ये वाहक आणि चालकांसह एकूण 43 जण होते अशी माहिती मिळाली आहे. त्यापैकी बहुतांश प्रवासी जळगाव जिल्ह्यातील आहेत.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी याबाबत सचिवांशी चर्चा केल्याची माहिती दिली. उत्तर प्रदेशच्या अधिकाऱ्यांशी सरकारचा समन्वय आहे. त्यांच्या मदतीनं मृतदेह महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत,
असं फडणवीस म्हणाले.याबाबत महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितलं की, “जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अंदाजित 41 पर्यटक हे नेपाळमध्ये दर्शनासाठी आणि पर्यटनासाठी गेले होते. त्यांची बस नदीमध्ये कोसळून अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.”
अनिल पाटील म्हणाले की, “तातडीने आपल्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून रिलीफ कमिशनर उत्तर प्रदेशांना निरोप दिलेला आहे,” असंही ते म्हणाले. तसं नेपाळ प्रशासनाला जे मृतदेह सापडले असतील, ते तत्काळ महाराष्ट्रातील संबंधित जिल्ह्यांमध्ये पोहोचवण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना दिल्याचंही पाटील म्हणाले. जळगाव जिल्ह्यातले आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातले भावीकही यात असल्याचं त्यांनी सांगितलं. पण त्यात सर्वाधिक आकडा, जळगावमधील लोकांचा आहे.स्थानिक पोलिसांच्या मते यात काही प्रवासी जखमी झाले आहेत. तर अनेक जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. बसची नोंदणी उत्तर प्रदेशातली असून ही बस पोखराहून काठमांडूला जात होती.
ही बस 300 मीटर खोल असलेल्या नदीत कोसळली. ऐनफारा याठिकाणी घटना घडली. अपघाताचं कारण अद्याप समजलेलं नाही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी X वर पोस्ट करत यातील भाविक महाराष्ट्रातील असल्याचं म्हटलं आहे. तसंच काही भाविकांचा मृत्यू झाल्याचा दावा करत फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. प्रारंभिक माहितीनुसार, हे भाविक जळगाव जिल्ह्यातील असल्याचे कळते.
या बस अपघातानंतर काठमांडू येथील भारतीय दूतावासाने आपत्कालीन मदत हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे.
भारतीय दूतावासाने सांगितले की, “पोखराहून काठमांडूला जाणारी एक बस आज मर्स्यांगदी नदीत, 150 मीटर खाली कोसळली. त्यात सुमारे 43 लोक होते. भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने मदत आणि बचाव कार्य पाहत आहे. भारतीय दूतावासाच्या आपत्कालीन मदत क्रमांक +977-9851107021 हा आहे.”