समाधी उत्सवाला भाविकांचा जनसागर उसळला; पुरणपोळीच्या महापंगती
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र ताहाराबाद येथील प्रतिपंढरीत श्रावण वद्य द्वादशीच्या पर्वणीत समाधी सोहळ्याला भाविकांचा जनसागर उसळला . टाळ- मृदुंगाचा गजर आणि जय जय महिपती, नमो महिपतींच्या नामघोषाने प्रतिपंढरी धन्य झाली. श्री संत कवी महिपती महाराज व त्यांचे शिष्य धोंडीभाऊ आणि श्री संत सेना महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा भाविकांच्या अलोट गर्दीत मोठ्या धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. श्रावण वद्य द्वादशीच्या पर्वणीत भाविकांची मांदियाळी मंत्रमुग्ध होऊन गेली होती.
गेल्या पाच दिवसांपासून श्रीक्षेत्र ताहाराबादला श्री संत कवी महिपती महाराजांच्या २३४ व्या समाधी सोहळ्याची आध्यात्मिक पर्वणी चालू आहे. काल सकाळी महाभिषेक, आरती,ग्रामप्रदक्षिणा, पारायण व नंतर समाधी सोहळ्याचे किर्तन आदीं धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. सकाळच्या सत्रात महंत ज्ञानेश्वर माऊली कदम व रात्री महादेव महाराज राऊत यांची सुश्राव्य किर्तनसेवा झाली. उद्या रात्री पोपट महाराज पाटील, जळगाव यांची किर्तन सेवा होणार आहे.सप्ताह समितीने सुयोग्य नियोजन करून श्रावण वद्य द्वादशीच्या दिवशी समाधी सोहळ्यानिमित्त पुरण पोळीच्या पंगतीचे नियोजन केले होते. ताहाराबाद परिसरातील श्रद्धाळू महिलांनी भरगच्च स्वयंपाक करून सप्ताहस्थळी आणला होता. त्यात पुरणपोळी, दूध, सारआमटी, भजे, पापड व तूप आदींसह अनेक मिष्टान्नाचा समावेश होता. किर्तनाची सांगता झाल्यावर हजारो भाविकांनी त्याचा आस्वाद घेतला. संत महिपती महाराज समाधी मंदिराचे प्रांगण भाविकांच्या पंगतीने फुलून गेले होते.
श्रावण वद्य द्वादशी महिपतींच्या निर्वाणदिना निमित्त अखंड चालू असलेल्या सप्ताहाची सांगता. रविवार दि.१ सप्टेंबर रोजी महंत ज्ञानेश्वर माऊली कदम यांच्या किर्तनसेवेने होऊन महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे. ह्या ज्ञानदान व अन्नदान यज्ञात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन मठाधिपती अर्जुन महाराज तनपुरे, सप्ताह समितीचे अध्यक्ष दत्तात्रय हारदे, उपाध्यक्ष सिताराम झावरे, लोकनियुक्त सरपंच निवृत्ती घनदाट, माजी उपसरपंच पप्पूशेठ माळवदे आदींनी केले आहे.
मिष्टान्नाचे भोजन महिपतींची श्रीमंती आहे!
श्रावण वद्य द्वादशीच्या पर्वणीत संत सेना महाराज, संत महिपती महाराज व त्यांचे शिष्य नांदूर खंदरमाळ येथील धोंडीभाऊ यांच्या निर्वाण दिनाच्या निमित्ताने घरोघरी पुरणपोळीच्या स्वयंपाकाची लगबग गृहिणींमध्ये सुरू होती. काही महिलांनी तब्बल १११ पुरणपोळ्या सप्ताहस्थळी आणल्या होत्या. महापंगतीत महिलांनी वाढण्याची भूमिका बजावून संतसेवेचा आनंद घेतला.सासरी जावयाला जे मिष्टान्नाचे भोजन दिले जाते, तसेच मिष्टान्नाचे भोजन महिपतींच्या वारकऱ्यांना दिले गेले. ही महिपतींची श्रीमंती आहे!
-महंत ज्ञानेश्वर माऊली कदम.