राहुरी येथून धुम स्टाईलने चोरी करणाऱ्या आरोपींचा एलसीबी पथकाने लावला छडा.
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी राहुरी शहरात बुधवार दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी रात्रीच्या सुमारास भर वस्तीमध्ये असलेल्या जंगम गल्ली येथे दोन अज्ञात भामट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण ओरबडून दुचाकीवरून धुम ठोकल्याची घटना घडली होती. या घटने बाबत राहुरी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झालेला असून अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने ही जबरी चोरी करणार्या सराईत गुन्हेगाराला जेरबंद केले आहे. त्याच्या कडून अनेक चोरीच्या गुन्ह्यांची उकल केली आहे.
आशा नंदकुमार जंगम, वय ४० वर्षे, रा. जंगम गल्ली, राहुरी, व त्यांची मुलगी या दोघी दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ८.३० वाजे दरम्यान शहरातील जंगम गल्ली येथील लुक्कड किराणा स्टोअर या किराणा दुकानात सामान घेत होत्या. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन भामट्यांनी आशा जंगम यांच्या गळ्यातील दिड तोळा वजनाचे मीनीगंठन ओरबडले आणि दोन्ही भामटे सुसाट वेगात पसार झाले होते. पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. दिनेश आहेर यांनी पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, संतोष लोंढे, फुरकान शेख, संदिप दरंदले, रणजीत जाधव, किशोर शिरसाठ, बाळासाहेब गुंजाळ, अमोल कोतकर, आकाश काळे, भाऊसाहेब काळे, सागर ससाणे, प्रशांत राठोड व महादेव भांड आदींचे पथक तयार करून या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला.
या तपासात सचीन लक्ष्मण ताके रा. शिरसगाव, ता. श्रीरामपूर याने त्याच्या साथीदारासह हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. गुप्त खबर्या मार्फत आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. तेव्हा आरोपीने सदरचा गुन्हा त्याचा साथीदार राजेंद्र उर्फ पप्पू भिमा चव्हाण रा. खटकळी, बेलापूर, ता. श्रीरामपूर याच्यासह केल्याची कबुली दिली. पोलीस पथकाने ताब्यातील आरोपीस विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने साथीदारासह राहुरी, लोणी व संगमनेर शहर हद्दीतील सहा चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले आहे. ताब्यातील आरोपीस गुन्ह्याच्या तपासकामी राहुरी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून त्याने केलेल्या गुन्ह्याचा पुढिल तपास राहुरी पोलीस करीत आहेत.