अनिल वीर सातारा : सातारा ग्रंथ महोत्सवाने सलग दोन तप वाचन संस्कृती रुजवण्याबरोबरच कला संस्कृती साहित्य क्षेत्रात साताऱ्याचे नाव उज्वल करणाऱ्या भूमिपुत्र व भूमीकन्यांना बोलते केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिकांच्या निर्मात्या तसेच उद्योजिका श्वेता शिंदे यांची प्रकट मुलाखत ‘श्वेत पर्व’ या शीर्षकांतर्गत रंगली.
चित्रपट, छोटा पडदा, व्यवसाय आणि कौटुंबिक जडणघडण याविषयी सुप्रसिद्ध मुलाखतकार व्याख्याते प्रदीप कांबळे आणि लेखक प्रताप गंगावणे यांनी श्वेता शिंदे यांना बोलते केले. मुलाखतकरांच्या प्रश्नांवर व्यक्त होत असतानाच मानपत्र, रेखाचित्र आणि साडी- चोळीच्या सत्कारामुळे सातारची ही माहेरवासीन खूपच भारावून गेली. नेत्रदिव्यांतून गंगा- जमुना पाझरत भावूकही झाली. यंदाच्या ग्रंथमहोत्सवात श्वेता शिंदे यांची प्रकट मुलाखत झाली. यावेळी शिरीष चिटणीस, वि. ना. लांडगे, डॉ. राजेंद्र माने, प्राचार्या प्रमोदिनी मंडपे, अभिनेत्री श्वेता खरात, संतोष पाटील, वनराज कुमकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘सातच्या आत घरात’ या कौटुंबिक संस्कारात वाढलेल्या व साचेबद्ध चौकटीत घडलेल्या श्वेता शिंदे यांनी साताऱ्याच्या निर्मला कॉन्व्हेंटमध्ये माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर मुंबईत काकांच्या घरी राहून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. त्यावेळी सर्वप्रथम ‘गदर’ या हिंदी चित्रपटात मैत्रिणींसोबत झळकल्याचे सांगितले. तसेच नाटक, चित्रपटातील सहभागासाठी आई- वडिलांची परवानगी मिळवताना झालेल्या पडद्यामागील नाट्य श्वेता शिंदे आणि उघडून दाखवले.त्या म्हणाल्या, “शूटिंगच्या काळामध्ये सुद्धा ग्रामीण भागामध्ये राहून तिथल्या सुखदुःखामध्ये सामील होऊन स्वतःच्या मुलीला मी सोबत नेले आणि तिला हे ग्राम्य जीवन दाखवले. कदाचित हाच वारसा मला देऊन माणूस आणि लागीरमध्ये मिळाला असेल. एक निर्माती म्हणून जेव्हा मी अभिनय सोडला तेव्हा हजारो कुटुंबीयांची सावली होण्याचा मी निर्धार घेतला.”
प्रदीप कांबळे यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना त्या असं म्हणाल्या की, अभिनय क्षेत्रामध्ये काम करू पाहणाऱ्या अनेक तरुण-तरुणींनी कोणत्याही प्रलोभनाला व कोणत्याही आर्थिक संबंधाला न भुलता स्वतःच्या दर्जावरती या क्षेत्रामध्ये पदार्पण करावे.तुमच्यामध्ये हिम्मत व तुमचे जमात हे करियर असेल तर तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये यश निर्माण करू शकता.
याप्रसंगी श्वेता शिंदे यांचे मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांच्या शुभहस्ते व सुप्रसिद्ध पटकथाकार लेखक प्रताप गंगावणे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी अभिनेते वनराज कुमकर व अभिनेती श्वेता खरात तसेच महेश सोनवणे व पूनम कापसे यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी अनंत लोहार यांनी काढलेले पेन्सिल स्केच प्रत्येक पाहुण्याला प्रदान करण्यात आले. मिल्ट्री अपशिंगे येथील सैनिक असोसिएशनच्या वतीने श्रुत घाडगे व कुदळे यांनी श्वेता ताईंचा सत्कार संक्रातीचे औचित्य साधून साडीचोळी देऊन सन्मान करण्यात आला.याप्रसंगी शिरीष चिटणीस, विना लांडगे, राजकुमार निकम, डॉ.राजेंद्र माने प्रमोदिनी मंडपे आदी उपस्थित होते.