कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव-नांदेसर या ग्राम रस्त्यावर रस्त्यालगत असणाऱ्या शेतकऱ्याने केलेले अतिक्रमण काढून सदर रस्ता वाहतुकीस मोकळा करण्याची मागणी वेळोवेळी करूनही पशासानाने दुर्लक्ष केल्याने शेवटी नाटेगावच्या ग्रामस्थांनी दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यासंदर्भात ग्रामस्थांनी तसे निवेदन पंचायत समिती गटविकास अधिकारी कोपरगाव यांना दिले आहे.

याबाबत ग्रामस्थानी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नाटेगाव नांदेसर रस्त्याने जा ये करणारे, (मळहद्दी) ता. कोपरगाव नाटेगाव येथील ग्रामपंचायत नाटेगाव यांचा गट नं. १ क्षेत्र १५ गुंठे वरील लगतच्या शेतकऱ्यांचे अतिक्रमण काढून रस्ता मजबुतीकरण व कॉन्क्रीटीकरण १५ वित्त आयोगातून सदर रस्त्याचे मजबुतीकरण व कॉन्क्रीटीकरण करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून निधी आलेला आहे. त्याकरिता ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे वेळोवेळी विनंती करण्यात आली मात्र प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेण्याचे काम केले आहे. रस्त्याबाबत दिवाणी स्वरूपाचा वाद आहे तसेच लगतच्या शेतकऱ्यांची हरकत असल्याची खोटी माहिती देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
वास्तविक सदर रस्त्याबाबत माहितीचे अधिकाराखाली दिनांक १६/७/२०२४ रोजी अॅड. एन. डी. पोळ व अॅड. डी. डी. पोळ यांनी अर्ज करून हरकत करणारे शेतकरी व वाद असलेबाबतची संदर्भित माहिती मागीतली होती, मात्र अद्याप प्रशासनाने कोणतीही माहिती दिली नाही.
नाटेगाव नांदेसर हा रस्ता गट नं. १ मधून अनेक वर्षांपासून वहिवाटीचा आहे. त्या रस्त्याने संत तुकाराम माध्यमिक विद्यालय नाटेगाव, जिल्हा परिषदेच्या शाळेत येणारे विद्यार्थी, शेतकरी, दूधविक्रेते, शेतमाल वाहून नेणारी शेतकरी यांची वाहने,इ. सर्वांनाच पावसाळ्यात अत्यंत अडचणींना तोंड द्यावे लागते. रस्ता कच्चा असल्याने वाहने चिखलात फसतात, रूग्णांना दवाखान्यात जाणे अत्यंत कष्टप्रद होते. मृतदेह देखील पाण्यातून न्यावे लागतात. पायी जाणारे व्यक्ती घसरून पडतात व प्रसंगी मारही लागतो,जखमीही होतात .
रस्त्याचे पूर्व व पश्चिम बाजू कडील शेतकरी अनेक प्रकारे वाहतुकीस अडथळे आणतात ,याबाबत केलेल्या तक्रारींची प्रशासान दखल घेत नाही. उलट लोकवर्गणीतून रस्ता करा, असे सांगतात. त्या रस्त्याची मोजणी करणेबाबत विनंती केली असता मोजणी देखील करीत नाही. वरिष्ठांची मदत घ्या असे सांगीतले तरी वरिष्ठांचीही मदत घेत नाही.त्यामुळे लवकरात लवकर सदर रस्त्याची मोजणी करून अतिक्रमण काढावे, व रस्त्याचे मजबुतीकरण व कॉन्क्रीटीकरण करावे अन्यथा दिनांक २४/२/२०२५ पासून आम्ही आमचे सर्व कुटुंबियांसह व विद्यार्थी मुलांसह ग्रामपंचायत नाटेगाव कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा या ग्रामस्थ शेतकऱ्यांनी दिला आहे,