प्राणघातक शस्त्र बाळगणारे चारजण गजाआड.

0

धारदार कत्ती घेऊन दहशत निर्माण करणाऱ्यांवर आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल.

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

               राहुरी शहरातील बस स्थानक परिसरात दि. २३ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास प्राणघातक शस्त्र जवळ बाळगून दहशत करणाऱ्या नाशिक व शेवगाव येथील चार जणांना राहुरी पोलिस पथकाने पकडून गजाआड केले. त्यांच्याकडून प्राणघातक शस्त्र देखील जप्त करण्यात आले. 

          दि. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ८ वाजे दरम्यान चार तरुण रिक्षामध्ये बसून आले. त्यांनी लोखंडी पाते असलेली धारदार कत्ती जवळ बाळगून परिसरात दहशत निर्माण केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुरज गायकवाड, प्रमोद ढाकणे, नदिम शेख, सचिन ताजणे, सतिष कुऱ्हाडे, अंकुश भोसले आदि पोलिस पथकाने बस स्थानक परिसरात धाव घेतली. त्या ठिकाणी चार आरोपी रिक्षा क्रमाक एम. एच. १५ एफ.यु. ९१६६ मध्ये बसून कत्ती जवळ बाळगुन दहशत करताना दिसून आले. पोलिस पथकाने आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेऊन जेरबंद केले. 

         

 पोलिस शिपाई प्रमोद सुखदेव ढाकणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी शुभम दत्तात्रय सापनर, वय २१ वर्षे, प्रेम दत्तात्रय सातनर, वय १९ वर्षे, ओमकार गोपाल जाधव, वय २३ वर्षे, तिघे रा. वज्रेश्वरी नगर, दिंडोरी रोड, मिरी पाट, नाशीक तसेच रोहीत राजु कारंडे, वय २३ वर्षे, रा. भानगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर या चार जणांवर गुन्हा रजि. नं. १३९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३ (५) तसेच शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम २५, ४ प्रमाणे आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढिल तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here