परळी, बारामती येथील पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयांना मंजूरी

0

मुंबई : परळी (जि. बीड) व बारामती (जि.पुणे) येथे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालयांच्या स्थापनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या दोन्ही महाविद्यालयांसाठी बांधकाम, वेतन व अनुषंगीक बाबींसाठी प्रत्येकी ६७१ कोटी ७७ लाख ९३ हजार रुपये खर्चाच्या तरतूदीसही मंजूरी देण्यात आली. 

या निर्णयानुसार बीड जिल्ह्यातील मौजे परळी येथे ७५ एकर जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर बारामती तालुक्यातील महाविद्यालयासाठी कऱ्हावागज येथे ८२ एकरची जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या दोन्ही महाविद्यालयांची प्रवेश क्षमता प्रत्येकी ८० विदयार्थी इतकी असणार आहे. 

या दोन्ही महाविद्यालयांसाठी प्रत्येकी २७६ पदांना मंजूरी देण्यात आली असून त्यामध्ये शिक्षक संवर्गातील ९६, शिक्षकेतर संवर्गातील १३८ तर बाह्यस्त्रोताद्वारे भरावयाच्या शिक्षकेतर संवर्गातील ४२ पदांचा समावेश आहे. तसेच महाविद्यालयांसाठी प्रत्येकी मनुष्यबळ वेतन व कार्यालयीन खर्चासाठी पुढील पाच वर्षांसाठी १०७ कोटी १९ लाख रुपायाच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर महाविद्यालय इमारत, उपकरणे, यंत्र सामुग्री व अनुषंगीक बाबी खरेदी करणे, वाहन खरेदी, शेड बाह्य पाणीपुरवठा, विहीर, विंधन विहीर आदी बाबींच्या खर्चाच्या तरतूदीस मान्यता देण्यात आली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here