उरण (विठ्ठल ममताबादे)
कोंकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.या दिनाच्या औचित्याने महाविद्यालयात सुप्रसिद्ध कवी जितेंद्र लाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. महाराष्ट्र गीत झाल्यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थांनी मराठी भाषा गीत सादर केले.
त्यानंतर जवळ जवळ दोन तास सुप्रसिद्ध कवी जितेंद्र लाड यांच्या प्रेम, आई वडील यांच्या विषयी आदर, साहस अशा विविध प्रकारच्या साहित्य विश्वात उपस्थित विद्यार्थ्यांना रममाण केले. प्रा. डॉ. अरुण चव्हाण यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मान्यवर कवींचा परिचय करून देण्यात आला.महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. एम. जी. लोणे यांनी आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे आपल्या भाषेचं महत्व अधिकाधिक वाढणार आहे.
भाषेतून संस्कृती चे जतन केले जाते. त्यामुळेच प्रत्येक मातृभाषा ही महत्वाची ठरते.असे सांगितले.कार्यक्रमाचे आभार प्रा. आनंद गायकवाड यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे कार्यक्रमाची शोभा अधिक वृद्धिंगत झाली. राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. डॉ. दत्ता हिंगमिरे आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. पराग कारुळकर यांनी हा मराठी भाषा गौरव दिन आयोजित करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.