सर्व शिक्षक संघटनांनी शिक्षण विभागाच्या भ्रष्टाचाराविरोधात लढा उभा करा -आ. किशोर दराडे

0

नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाची सहविचार सभा येवला येथे संपन्न

येवला प्रतिनिधी : सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन शिक्षण विभागाच्या विरोधात लढा उभा करावा . त्याचप्रमाणे शिक्षण खात्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढत असुन संघटनांच्या वेगवेगळ्या भुमिकेमुळे शिक्षण विभागातील अधिकारी मगरूर झाले आहेत . संघटनांच्याच पदाधिकाऱ्यांवर शाब्दीक व मानसिक हल्ले सुरू केले आहे . याचा बंदोबस्त करण्यासाठी एक व्हा . मी तुमच्या पाठीशी आहे. असे अशावसन शिक्षक आमदार यांनी सर्व शिक्षकांना दिले. शनिवार दिनांक ५ एप्रिल २०२५ रोजी एस.एन.डी.इंजिनिअरिंग कॉलेज बाभुळगाव तालुका येवला येथे नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाची सहविचार सभा शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या समवेत संघाचे पदाधिकारी यांच्या समवेत पार पडली . यावेळी ते बोलत होते.

या बैठकीमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित समस्यांविषयी चर्चा करण्यात आली.  सभेच्या प्रारंभी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस.बी.देशमुख यांनी प्रास्ताविक करून आमदार किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक संघाच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात आले.त्यानंतर सहविचार सभेच्या विषय पत्रिकेनुसार सभेचे कामकाज सुरू झाले.

 मुख्याध्यापक संघाचे सचिव एस.बी.देशमुख यांनी आमदार किशोर दराडे यांच्या म्हणण्यास दुजोरा देत आम्ही शिक्षक संघटनांचे पदाधिकारी एकजूट करून सर्वांना एकत्र घेऊन एकत्रित लढा देऊ असे आश्वासन दिले.

 मुख्याध्यापक संघाचे सचिव एस.बी.देशमुख तसेच उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या प्रलंबित समस्यांविषयी माहिती दिली.त्यामध्ये प्रामुख्याने शालार्थ आयडी मान्यता,शाळांचा टप्पा अनुदान(२०,४०,६०,८०,१०० टक्के) मान्यता देणे,शिक्षण विभागातील अधिकारी यांच्याकडून होणारी अडवणूक,संस्था स्तरावर असलेल्या अंतर्गत वादामुळे कर्मचारी  यांचे सेवानिवृत्त प्रस्ताव पाठवून मंजुरी घेणे,प्रधानमंत्री पोषण आहार योजनेच्या समस्या,शालेय संच मान्यतेसाठी आधार व्हॅलिडेशन बाबत सुविधा उपलब्ध करून देणे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना अशैक्षणिक काम न देणे,पॅट परीक्षेच्या वेळापत्रकाबाबतचे प्रश्न व शाळांना निकाल विहित मुदतीत देण्यात येणाऱ्या अडचणी,शालेय शिक्षण विभागाने आगामी काळात राज्यात सी.बी.एस.सी.बोर्डाच्या धर्तीवर राबविण्यात येणारा अभ्यासक्रम, आणि सदर पॅटर्न राबविताना शहरी,ग्रामीण,अतिदुर्गम भागात उपलब्ध सोयी सुविधा या विषयीच्या अडचणी,तसेच महाराष्ट्र शासनाने राज्यातील शाळांचा दर्जा व गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्राच्या धर्तीवर बजेट मध्ये आर्थिक निधीची तरतूद करणे,शालेय शिक्षण विभागाने शाळांच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेताना शैक्षणिक क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती आणि विविध संघटनांचे पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणे इत्यादी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

राज्यातील सर्व विभागाचे शिक्षक आमदार एकत्र विचारविनिमय करून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावू.शासन सदैव तुमच्या पाठीशी आहे. काहीही काळजी करू नका.असे आश्वासन शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी दिले. तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे नाशिक विभागीय अध्यक्ष यांच्या समवेत एप्रिल महिन्यात मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी यांच्या सोबत सहविचार सभेचे आयोजन करून शालार्थ आयडी मान्यता बाबतचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन आमदार किशोर दराडे  यांनी दिले.या सहविचार सभेच्या प्रसंगी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस.बी.देशमुख, प्राचार्य डॉ अनिल माळी , दीपक गायकवाड, प्रदिप सांगळे, के .डी . देवढे , बी.डी.घोटेकर,प्राचार्य अनिल खालकर,प्राचार्य -आप्पासाहेब जमदाडे,एन. व्हि.शिंदे,सुभाष कानडे,कानिफ मढवई, पोपट बरे,अरुण विभुते, विनायक पाटील, एम डी काळे आदी मान्यवर यांनी सहविचार सभेत सहभाग घेऊन  विचारविनिमय करण्यात आला.कानिफ मढवई यांनी आमदार किशोर दराडे साहेब आणि उपस्थित सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here