पैठण ते छत्रपती संभाजीनगर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम मुदत संपून देखील अपूर्णच असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षभरात या रस्त्यावर झालेल्या अपघातांमध्ये १५ हून अधिक जणांचा जीव गेला आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष पाहायला मिळत आहे.
.
पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील गावालगत नको तेथे दुभाजक व वाट सोडल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाही. अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहनचालकांना अचानक दुसऱ्या बाजूला जावे लागते. त्यामुळे या मार्गावर अपघाताचा धोका वाढला असून विद्यार्थ्यांसह प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. एखादा मोठा अपघात झाला तर याला संबंधित ठेकेदार जबाबदार असेल, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून व्यक्त केली जात आहे. रविवारी जायकवाडी येथील राहुलनगर जवळ झालेल्या अपघातात एका महिलेचा जीव गेला आहे. तीन ते चार ठिकाणी पुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे या मार्गावरुन ये-जा करणारी वाहतूक अडचणीची ठरत आहे. गावाकडे जाणाऱ्या मुख्य चौकात आल्यानंतर तेथे दिशादर्शक फलक चुकीचे लावण्यात आलेले आहेत. एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे जाण्यासाठी वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. त्यामुळे या अपूर्ण रस्त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. त्यातच या महामार्गावरील पिंपळवाडी, कारखाना, चितेगाव पेट्रोल पंपासमोरून गावाकडे जाणारा रस्ता हा ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे अपूर्ण राहिलेला आहे. प्रशासनाच्या व ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे पैठण ते छत्रपती संभाजीनगर रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. ते पूर्ण कधी होणार ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
म्हणून वाढले अपघात रस्ता ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यामधील दुभाजक छोटे असल्याने येणारी वाहने सरळ दुसप्या बाजूकडे उभ्या असणाऱ्या प्रवाशाच्या समोर येत आहेत. त्यामुळे त्यांना आपला जीव मुठीत धरून उभे राहावे लागत आहे. यातून अनेक अपघात वाढल्याचे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांनी सांगितले.