[ad_1]
औंढा नागनाथ तालुक्यातील सिध्देश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या उदघाटनाची घाई आरोग्य प्रशासनाला चांगलीच नडली असून उदघाटनाच्या दुसऱ्याच दिवशी मंगळवारी ता. 22 सकाळी पावने दहा वाजता आरोग्य केंद्र कुलुप बंद होते. त्यामुळे रुग्णांची गैरसो
.
औंढा नागनाथ तालुक्यातील सिध्देश्वर व परिसरातील गावे व तांड्यावरील गावकऱ्यांना तातडीने आरोग्य सेवा मिळावी यासाठी सिध्देश्वर येथे सुमारे आठ वर्षापुर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले. या आरोग्य केंद्राला सिध्देश्वर सह, गांगलवाडी, नंदगाव, ढेगज, वडचूना, दुरचूना, सावंगी, पाताळवाडी, भोसी, दुधाळा, सावळी या गावांसह परिसरातील सात ते आठ तांडावस्ती व इतर गावे जोडण्यात आली आहेत.
दरम्यान, या ठिकाणी आठ वर्षापुर्वी इमारतीचे बांधकाम मंजूर होऊन बांधकाम देखील तातडीने पूर्ण करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात आरोग्य केंद्र सुरुच करण्यात आले नाही. त्यानंतर कोरोना काळात या ठिकाणी कोविड सेंटर सुरु करून कोविडच्या रुग्णांना उपचारासाठी या प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आले होते. मात्र कोविड नंतर पुन्हा हि इमारत ओस पडली होती.
दरम्यान, सिध्देश्वर प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर होऊन इमारत पूर्ण झाल्यानंतरही उदघाटन झालेच नाही. त्यामुळे या भागातील रुग्णांना उपचारासाठी औंढा नागनाथ किंवा हिंगोली या ठिकाणी उपचारासाठी यावे लागत होते. रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन या इमारतीचे लोकार्पण करून तातडीने आरोग्य केंद्र पुर्णक्षमतेने सुरु करावे अशी मागणी करण्यात आली होती. मात्र या मागणीसाठी आरोग्य विभागाने चालढकल सुरु केली होती.
त्यानंतर आरोग्य विभागाने सोमवारी ता. 21 धावपळ करून आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण केले. आता या ठिकाणी आरोग्य केंद्र सुरु होऊन रुग्णांना सेवा मिळेल अशी अपेक्षा होती. त्यानंतर आज सकाळी पावने दहा वाजण्याच्या सुमारास काही जण आरोग्य केंद्राच्या ठिकाणी गेले असता आरोग्य केंद्र कुलुपबंद अवस्थेत दिसून आले होते. लोकार्पण सोहळ्यानंतर दुसऱ्याच दिवशी कुलुपबंद आरोग्य केंद्रामुळे नागरीकांनी नाराजीचा सुर व्यक्त केला आहे. तर आता पुन्हा एकदा रुग्णांची गैरसोय होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी कैलास शेळके व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
रुग्णांसाठी सुविधाच नाहीत
या ठिकाणी रुग्णांसाठी पिण्याचे पाणी नाही, इमारतीला विज पुरवठा नाही. कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरावस्था झाली आहे. तर केवळ दोन वैद्यकिय अधिकारी व एक परिचारीका यांची नियुक्ती झाली असून इतर पदे रिक्त आहेत.
[ad_2]