[ad_1]
महायुतीमध्ये रोजच खटके उडताना दिसून येत आहे. भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी शिवसेना आमदाराला झापले आहे. आमच्याकडे 237 आमदार आहे, ज्यांना युतीत राहायचंय त्यांनी राहावे, नाही तर बाहेर पडावे अशा शब्दात बाबुराव कदम कोहळीकर यांना सुनावले आहे.
.
दरम्यान काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यात तांडावस्ती योजनेचा निधी आमदारांना विश्वासात न घेता परस्पर वाटप केल्याच्या आरोपावरून शिंदेसेनेचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी चक्क पालकमंत्री अतुल सावे यांच्या दौऱ्यात कार्यकर्त्यांसह निषेध करण्याचा इशारा दिला.
नेमके सावे काय म्हणाले?
अतुल सावे म्हणाले की, मी आमदारांच्या नाराजीची खूप काळजी करत नाही. आमच्याकडे 237 आमदार आहेत, आम्ही युतीत काम करतोय, ज्याला युतीत राहायचंय त्यांनी राहावे, ज्यांना नाही राहायचे, त्यांनी बाहेर पडावे.
पालकमंत्री अतुल सावे म्हणाले की, तांडावस्तीचा प्रस्ताव हा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आला होता, असे सांगितले. आमदारांनी शिफारस केल्यानंतरच हा प्रस्ताव माझ्याकडे आला. त्यानंतर तो मंजूर करण्यात आला. यासंदर्भात तक्रार आल्यानंतर त्या प्रस्तावाला स्थगिती देण्यात आली असल्याची सारवासारव सावे यांनी केली.
साडेसात कोटींची कामे स्थगित
जिल्ह्यातील तांडावस्तीची कामे देताना स्थानिक आमदारांना विश्वासात घेण्यातआले नाही, अशी तक्रार भाजपचे आमदार तुषार राठोड, शिंदे गटाचे बाबूराव कदम, भीमराव केराम आदींनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री अतुल सावे यांनी मंजूर केलेली 7.35 कोटींची कामे स्थगित केली. मुख्यमंत्र्यांनी दणका दिल्यानंतर पालकमंत्री अतुल सावे हे नांदेडात नियोजन समितीच्या बैठकीचा आढावा घेण्यासाठी आले होते, त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे म्हटले आहे.
राज्यमंत्री बोर्डीकरांनी व्यक्त केली नाराजी
मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, माझ्या मतदारसंघात विकासकामं व्हावीत, तांडा वस्तीचा निधी मिळावा, यासाठी शिफारस केली होती. तशी मागणी केली होती. पण त्यातील एकही काम झाले नाही. पण दुसऱ्यांना ही कामे दिली गेलेली आहेत. माझ्या मतदारसंघात कामे होत असताना माझी कोणत्याही प्रकारची शिफारस घेतली गेलेली नाही, अशी नाराजी बोर्डिकरांनी व्यक्त केली आहे.
[ad_2]