[ad_1]
धर्मादाय रुग्णालयांनी आरोग्याशी संबंधित सर्व योजना लागू कराव्यात असे निर्देश राज्य सरकारने रुग्णालयांना दिले आहेत. तर अनामत रकमेअभावी, डिपॉझिटअभावी उपचार नाकारू नयेत असे नमूद केले आहे.
.
दरम्यान तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने चौकशी करून अहवाल व निष्कर्ष राज्य सरकारला सादर केले होते. यानंतर राज्य सरकारने धर्मदाय रुग्णालयांना नवे निर्देश दिले आहेत.
संकेतस्थळावर अद्ययावत माहिती द्या
यामध्ये महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम या सर्व योजनाचा लाभ द्यावा. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांवर प्राधान्याने उपचार करण्यात यावेत. गर्भवतींवरील उपचाराचा आपत्कालीन परिस्थितीत समावेश करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तर आयव्हीएफ खात्याबाबतची अद्ययावत माहिती रुग्णालयांकडून घेऊन धर्मादाय आयुक्त यांच्या संकेतस्थळावर नियमितपणे अद्ययावत करण्यात यावी, या सूचनांचा त्यामध्ये समावेश आहे.
मंत्रालयातील कक्षाची पूर्वमान्यता घ्यावी
धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन, दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी नियोजित उपचार-शस्त्रक्रियेसाठी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व रुग्णालयांनी ऑनलाइन प्रणालीद्वारे मंत्रालयातील धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची पूर्वमान्यता घ्यावी.
भिसे कुटुंबाची साक्ष झाली पूर्ण; डॉ. घैसास मात्र सुनावणीस गैरहजर
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात भिसे कुटुंबीय सोमवारी या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या मेडिकल कौन्सिलसमोर हजर झाले. त्यांनी विविध माहिती व घटनेच्या दिवशीचा घटनाक्रम मेडिकल कौन्सिलसमोर सादर केला. कौन्सिलने विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांचीदेखील त्यांनी उत्तरे दिली आहेत. त्यामुळे भिसे कुटुंबीयांची साक्ष सोमवारी पूर्ण झाली. परंतु या सुनावणीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे माजी प्रसूतिरोगतज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास हे गैरहजर राहिले आहेत. या प्रकरणात डॉ. घैसास यांच्यासह दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली. याबाबत तनिषा भिसे यांचे पती संतोष भिसे म्हणाले, आमच्याकडील सर्व गोष्टी मेडिकल कौन्सिलसमोर ठेवलेल्या आहेत. काही चुकीच्या गोष्टी रुग्णालयाच्या वतीने कौन्सिलसमोर ठेवण्यात आल्या आहेत.
[ad_2]