जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 26 पर्यटक ठार झाले. नागपूरच्या एका प्रत्यक्षदर्शी दाम्पत्याने या घटनेचा थरार सांगितला आहे. त्यांच्या मते, ते हल्ला झाला त्या ठिकाणापासून केवळ 20 मिनिटांच्या अंतरावर होते. हल्लेखोरांनी बराच वेळ ग
.
नागपूरच्या दाम्पत्याने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, आम्ही घटनास्थळावरून अवघ्या 20 मिनिटांच्या अंतरावर होतो. गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर सर्वजण जिवाच्या आकांताने सैरावैरा धावत सुटले. पहिल्यांदा तर काय झाले हे कुणालाच समजलेच नाही. पण काही लोकांनी अतिरेकी हल्ला झाल्याची आरोळी ठोकली आणि त्यानंतर सर्वचजण धावत सुटले. त्यानंतर आम्ही मागे वळून पाहिले नाही.
अतिरेक्यांनी बराच वेळ गोळीबार केला. सर्वच लोक सुरक्षित स्थळी धाव घेत होते. आम्हीही धावत सुटलो. हल्ला झाला तेथून बाहेर पडण्यासाठीचा गेट अवघ्या 4 फुटांचा होता. गर्दी खूप होती. पळताना माझ्या पत्नीचा पाय फ्रॅक्चर झाला. मला पत्नी व मुलाच्या सुरक्षेची काळजी वाटत होती. मी ही घटना आयुष्यभर विसरणार नाही.
रुग्णालयात दाखल महिलेने सांगितले की, सर्वच पर्यटक ओरडून सांगत होते की, फायरिंग होत आहे पळा. लोक बाहेर पडण्यासाठी धक्का देत होते. प्रत्येकजण आपल्या जिवाच्या आकांताने पळत सुटला होता. तिथे लहान मुलेही होते. आम्हाला बाहेर पडण्यात अडचण येत होती.
एका टूर गाईडने सांगितले की, मी गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर घटनास्थळी पोहोचलो. काही जखमींना घोड्यावर बसवून तेथून बाहेर काढले. वहीदने सांगितले की, मी काही लोकांना जमिनीवर पडल्याचे पाहिले. ते ठार झाल्याचे दिसून येत होते.
पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जण ठार
उल्लेखनीय बाब म्हणजे जम्मू काश्मीरच्या पलगमामध्ये मंगळवारी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 पर्यटक झाले. यात महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. लष्कराच्या वेशात आलेल्या या अतिरेक्यांनी पर्यटकांना प्रथम त्यांचा धर्म विचारला आणि त्यानंतर ओळखपत्र पाहून त्यांना गोळ्या घातल्या. मृतांत 2 परदेशी नागरिकांचाही समावेश आहे.
या हल्ल्यात डोंबिवली (पूर्व-पश्चिम) येथील नवपाडा, पांडूरंग वाडी व नांदिवाली भागातील 3 जणांचा मृत्यू झाला आहे. हेमंत जोशी, संजय लेले व अतुल मोने अशी त्यांची नावे आहेत. हे सर्वजण पर्यटनासाठी जम्मू काश्मीरला गेले होते.
अतुल मोने हे डोंबिवली पश्चिमेतील ठाकूरवाडी परिसरातील श्रीराम अचल इमारतीत राहत होते. ते आपले कुटुंबीय व मित्रांसोबत काश्मीर खोऱ्यात गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी व मुलीसह एकूण तीन कुटुंब तिथे गेले होते. अतुल मोने हे रेल्वेच्या परळ वर्कशॉपमध्ये सेक्शन इंजिनीअर म्हणून कार्यरत होते. हल्ल्याची माहिती मिळताच मोने यांचे नातेवाईक काश्मीरला रवाना झाले. संजय लेले यांचा मुलगा हर्षल याच्या हाताला गोळी चाटून गेली आहे. त्यामुळे तो देखील जखमी झाला आहे.
पनवेलच्या दिलीप देसलेंचा मृत्यू
पनवेल येथून एकूण 39 पर्यटक जम्मू-काश्मीरच्या पर्यटनासाठी गेले होते. या हल्ल्यात पनवेल येथील खांदा कॉलनी येथे राहणारे दिलीप देसले यांचा मृत्यू झाला. तर सुबोध पाटील हे या हल्ल्यात जखमी झालेत. त्यांना एअरलिफ्ट करून श्रीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. इतर सर्व पर्यटक सुरक्षित आहेत.
पुण्यातील दोघांचा मृत्यू
या अतिरेकी हल्ल्यात पुण्यातील कौस्तुभ गणबोटे व संतोष जगदाळे या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. कौस्तुभ व संतोष हे आपल्या कुटुंबीयांबरोबर काश्मीर पर्यटनासाठी गेले होते. बैसरन भागात फिरत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या दोघांना त्यांच्या कुटुंबातील सदस्य व स्थानिकांनी रुग्णालयात नेले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.