अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील अनुसूचित जाती-जमाती, नवबौद्ध मुलांच्या निवासी शाळेत मोठ्या विद्यार्थ्यांकडून लहान मुलांची रॅगिंग होत असल्याची भयंकर गोष्ट समोर आली आहे. ऑल इंडिया पँथर सेनेचे नेते दीपक केदार यांनी एका व्हिडिओ पोस्टद्वारे ही घटना उज
.
दीपक केदार यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत काही विद्यार्थी आपल्यापेक्षा लहान असणाऱ्या मुलांना कंबरेच्या पट्ट्याने मारहाण करताना दिसून येत आहेत. काहीजण त्यांच्या कानशिलात हाणतानाही दिसून येत आहेत. या व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
खाली वाचा दीपक केदार यांची पोस्ट जशीच्या तशी
दीपक केदार आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, जामखेड येथील अनुसूचित जाती-जमाती, नवबौद्ध मुलांच्या निवासी शाळेतील हे भयंकर वास्तव! जामखेड, जिल्हा अहमदनगर येथील अनुसूचित जाती-जमाती आणि नवबौद्ध मुलांच्या निवासी शाळेत मानवतेचा अंत होत आहे! लहान मुलांवर मोठ्या विद्यार्थ्यांकडून रॅगिंगच्या नावाखाली बेदम मारहाण आणि शारीरिक-मानसिक शोषण होत आहे. ही मुले येथे शिक्षणासाठी आली आहेत, पण त्यांना मिळत आहे अमानुष अत्याचार!
मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा
मुख्याध्यापक आणि शिक्षक मुलांकडे लक्ष देत नाहीत. वॉर्डन कुठे आहे? त्यांच्याकडून कोणतीही देखरेख नाही! शाळेतील विद्यार्थ्यांच्या अनुदानाच्या पैशांवर मुख्याध्यापक आणि कर्मचारी डल्ला मारत असल्याचा गंभीर आरोप आहे. मुलांच्या सह्यांचा गैरवापर करून बँकेतून पैसे काढले जात आहेत. मुलांच्या रूममध्ये काय चाललंय, याकडे कुणाचं लक्ष नाही. मुले आरडत-ओरडत असतानाही त्यांचा आवाज कोणाला ऐकू येत नाही!
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांना प्रश्न
सामाजिक न्यायाची ही अवस्था आहे का? दलित, नवबौद्ध मुलांना वसतिगृहात जनावरांसारखं कोंडलं जात आहे. तुम्ही खुलताबादच्या नामकरणात आणि इतर किरकोळ गोष्टींमध्ये अडकले आहात, पण या मुलांच्या सुरक्षेचं काय? सामाजिक न्याय विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे!
आमदार रोहित पवार यांना आवाहन
जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून तुम्ही दलितांच्या मतांचा आदर करता, पण त्यांच्या मुलांच्या वसतिगृहातील सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? आजपर्यंत तुम्ही एकदा तरी या शाळेची पाहणी केली आहे का? ही मुलं तुमच्या मतदारसंघात राहतात, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी तुमची नाही का?
मुख्यमंत्री महोदय, कृपया लक्ष द्या!
राज्यात रस्त्यावरील सिग्नल तोडणाऱ्यांसाठी सीसीटीव्ही आणि कंट्रोल रूम आहे, गोशाळांनाही सुरक्षा आहे, मग दलित मुलांच्या वसतिगृहांचं काय? त्यांचं शारीरिक-मानसिक शोषण होत आहे, त्यांना सीसीटीव्ही सुरक्षा का मिळू नये?
आमची मागणी
तात्काळ चौकशी: मुख्याध्यापक, शिक्षक, वॉर्डन आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करा. सीसीटीव्ही सुरक्षा: राज्यातील सर्व सरकारी वसतिगृहांमध्ये सीसीटीव्ही बसवून त्याचा कंट्रोल सामाजिक न्याय विभागाकडे द्या. आधुनिक वॉर रूम: वसतिगृहांच्या सुरक्षेसाठी जिल्हास्तरावर वॉर रूम स्थापन करा. आरोपींवर कारवाई: मुलांचं शोषण करणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करा.
ऊसतोड मजुरांची ही लेकरं आहेत! त्यांचे आई-वडील विश्वासाने या शाळेकडे आपली मुलं सोपवतात, पण वास्तव भयंकर आहे. किती महिने या मुलांचं शोषण झालं असेल? हा व्हिडीओ गंभीर आहे, याकडे दुर्लक्ष करू नका! ऑल इंडिया पँथर सेना याचा तीव्र निषेध करते! बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष केला, पण आज त्यांच्या समाजाच्या मुलांची ही अवस्था आहे. कसं शिकायचं? कसं मुक्त जगायचं? जबाबदारी ज्यांना दिली, त्यांचाच हा बेजबाबदारपणा आहे! अहिल्यानगर पोलीस अधीक्षकाने तात्काळ कार्यवाही करावी. संजय शिरसाठ, दखल घ्या! मुख्यमंत्री, दखल घ्या! न्याय मिळालाच पाहिजे, असे दीपक केदार यांनी म्हटले आहे.