बारा कोटी मराठी भाषक असूनही मराठी भाषाविज्ञान हा महत्त्वाचा विषय महाराष्ट्रात दुर्लक्षित आहे. राज्याच्या कुठल्याही विद्यापीठात मराठी भाषाविज्ञान शिकण्याची सोय नाही; कारण मराठी भाषेत ते कुठेही शिकवले जात नाही, अशी खंत ज्येष्ठ भाषातज्ज्ञ प्रा. प्र. ना.
.
‘सोस्यूर ते चॉम्स्की’ हे पुस्तक म्हणजे आधुनिक भाषा विज्ञानातील काही मूलभूत निबंधांचे सटीक भाषांतर असून, ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. मिलिंद मालशे यांनी भाषांतर केले आहे. लोकवाङ्मय गृहतर्फे या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी प्रा. परांजपे बोलत होते. ज्येष्ठ भाषातज्ज्ञ भाषांतरकार डॉ. मिलिंद मालशे तसेच भाषाविज्ञानाचे अभ्यासक डॉ. प्रकाश परब, डॉ. विजया देव हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी अध्यक्षस्थानी होते.
डॉ. मालशे म्हणाले, भाषाविज्ञान हे वैज्ञानिक अभ्यास पद्धती वापरणारे विशिष्ट असे अभ्यासक्षेत्र आहे. पाश्चात्य जगात २०व्या शतकात सोस्यूर या स्विस अभ्यासकाने व्याख्यानांतून मांडलेली तत्त्वे आधुनिक भाषाविज्ञानाला पायाभूत ठरली. आणि विविध भाषाभ्यासकांनी त्यावर मंथन करून आपापले विचार निबंध आणि पुस्तक रूपांत मांडले. यामध्ये भारतीय भाषांचाही संदर्भ आहे. मराठी भाषेत हे विचार एकत्रित यावेत, हा भाषांतर करण्यामागचा एक महत्त्वाचा हेतू होता. भाषा ही व्यवस्था असते. तिच्या अनेक पातळ्या असतात. ध्वनी, शब्दरूपे, वाक्य आणि अर्थ अशा अनेक स्तरांवर ही व्यवस्था कशी घडलेली असते याचा अभ्यास व संशोधन भाषाविज्ञानात होते. हे आधुनिक विचारधन मराठीमध्ये आणणे महत्त्वाचे वाटले.
राज्यातील विद्यापीठांमध्ये भाषाविषयक ज्ञान इंग्रजी भाषेत दिले जाते, याविषयी टीका करून प्रा. परांजपे म्हणाले, मराठी भाषेतच मराठी भाषाविज्ञान शिकण्यासाठी चांगली पाठ्यपुस्तकेही उपलब्ध नाहीत. डॉ. मिलिंद मालशे यांनीच लिहिलेले एकमेव पुस्तक भाषाविज्ञानासंदर्भात उल्लेखिले जाते. स्वतः मालशे यांनीच आता दीर्घ काळानंतर पुन्हा एकदा मराठी भाषा विज्ञानासंदर्भातील मौलिक असे नवे पुस्तक वाचकांच्या आणि अभ्यासकांच्या हाती दिले आहे. हा फक्त अनुवाद वा भाषांतर नाही. मराठी वाचकांची तयारी आणि वकूब लक्षात घेत त्यांनी हे भाषांतर केले आहे. त्यातून मराठीच्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, अभ्यासकांना मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळेल’, असे ते म्हणाले.
डॉ. विजया देव यांनी मराठीमधील भाषाविज्ञानविषयक अस्तित्वात असलेल्या लेखनाचा परामर्श घेतला. डॉ. मालशे यांच्या दीर्घकालीन व्यासंगाचे फलित म्हणजे हे पुस्तक आहे. सैद्धांतिक मांडणी आणि उपयोजन, या दोन्हीवरही त्यांची उत्तम पकड असल्याने भाषाविज्ञानाचे क्षेत्र समृद्ध होत राहील.